स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त लावण्यात आलेला स्मृतिस्तंभ व शिलालेख अडगळीत पडला, स्वातंत्र्यसैनिकांत संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी लावण्यात आलेले स्मृतिस्तंभ व त्या त्या तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाचा उल्लेख असलेले स्तंभ उभारण्यात आले होते. मात्र बिलोली नगर परिषदेचा हा स्तंभ गायब झाला असून, तो एका खोलीमध्ये अडगळीत पडला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतर देखील हा स्तंभ योग्य ठिकाणी लावण्याचा विसर या नगर परिषदेला पडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

1972 साली तत्कालीन सरकारने हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवानिमित्त जिल्ह्याच्या ठिकाणी व तालुक्याच्या ठिकाणी स्मृतीस्तंभ उभारले होते. त्यात त्या त्या तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांची नावे व त्यांच्याही नावे पाठीमागच्या बाजूने लिहून हे स्मृतीस्तंभ उभारले होते. काही ठिकाणी इमारतीचे बांधकाम सुरु असल्याने ते अन्य ठिकाणी बसविण्यात आले होते. नांदेड येथे वजिराबाद पोलीस ठाण्याच्या समोर सदरचा स्तंभ आजही उभा आहे. तर अन्य तालुक्यांच्या ठिकाणी देखील तो नगर परिषद किंवा मुख्यस्थळी लावण्यात आला आहे. मात्र बिलोली नगर परिषदेच्या जुन्या बसस्थानकासमोरील इमारतीत लावलेला हा स्मृतिस्तंभ मात्र गायब झाला आहे. याबाबत माहिती घेतली असता नव्या इमारतीचे बांधकाम सुरु झाल्यानंतर हा स्तंभ काढून घेण्यात आला होता आणि तो बाजूला ठेवण्यात आला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याजवळ बसविण्यात आला. तेथेही नुतनीकरणाचे काम काही वर्षापूर्वी सुरु झाले. त्यामुळे तेथील स्तंभ देखील काढून ठेवण्यात आला होता. मात्र आजपर्यंत त्याची पुनर्स्थापना झालेली नाही. याबाबत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दिवंगत नारायणराव केसराळीकर यांचे नातू जयदिप तिम्माराव केसराळीकर यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना 21 ऑगस्ट रोजी लेखी पत्र देवून स्वातंत्र्यसैनिकांच्या नावे असलेला शिलालेख व स्मृतीस्तंभ बिलोली नगर परिषदेतून गायब झाला आहे. ज्या स्मृतीस्तंभावर त्या तालुक्यातील हुतात्मा गोविंदराव पानसरे, स्वातंत्र्यसैनिक मारोतीराव पाटील टाकळीकर, स्वातंत्र्यसैनिक नारायणराव केसराळीकर, उद्धवराव मेडेवार, रत्नाळीकर, चव्हाण यांची नावे या शिलालेखावर होती. नगर परिषदेच्या इमारतीसमोर दर्शनी ठिकाणी हा स्तंभ लावण्यात आला होता. मात्र रस्ता रुंदीकरण व इमारतीच्या नव्या बांधकामामुळे तो काढून ठेवण्यात आला. त्यानंतर हा स्तंभ अद्यापही गायब असून, त्याची पुनर्स्थापना करण्याची मागणी त्यांनी निवेदनाव्दारे केली होती. या निवेदनावर अ‍ॅड. धोंडीबा पवार यांचीही स्वाक्षरी होती.

सदर प्रतिनिधीने याबाबत माहिती घेतली असता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याजवळ हा स्तंभ बसविण्यात आला. मात्र काही वर्षापूर्वी तो काढून टाकून अन्यत्र ठेवण्यात आला. आता मात्र सदरचा स्तंभ नगर परिषदेच्या एका खोलीमध्ये कुलूप बंद असून, त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. याबाबत तहसीलदार श्रीकांत निळे पाटील यांनी सामनाशी बोलताना सांगितले की, स्वातंत्र्यसैनिकांच्या या स्तंभ व शिलालेखासंदर्भात संबंधित विभागाला व कर्मचार्‍यांना याबाबतच्या सूचना दिल्या असून, शिलालेख स्तंभाची तत्काळ दुरुस्ती करण्यात येवून नुतन नगर परिषदेच्या आवारात स्वातंत्र्यसैनिकांचा स्तंभ उभारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. ज्यांच्या काळात हा स्तंभ उभारण्यात आला, त्यावेळेचे नगराध्यक्ष माजी आमदार गंगाधर पटणे यांनी सदरचा प्रकार संतापजनक असून, गेल्या काही वर्षापासून हा स्तंभ अडगळीत पडला आहे. कुणालाही त्याचे देणे घेणे नाही, शासनाने याबाबीची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. एकंदरच स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव सुरू असताना बिलोली नगर परिषदेच्या प्रशासनाला या स्मृतीस्तंभ व शिलालेखाचे फारसे गांभीर्य नसल्याने स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.