प्रख्यात शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्वाल्हेर घराण्याच्या प्रख्यात  शास्त्राrय गायिका मालिनी राजूरकर यांचे आज हैदराबाद येथे निधन झाले.  त्या 82 वर्षांच्या होत्या. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे राजूरकर यांना काल स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. राजूरकर यांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थिव उस्मानिया मेडिकल कॉलेजला दान करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत.

मालिनी राजूरकर यांचा जन्म 8 जानेवारी 1941 रोजी झाला. त्यांचे बालपण राजस्थानमध्ये गेले. त्या तीन वर्षे अजमेरच्या सावित्री गर्ल्स हायस्कूल आणि कॉलेजमध्ये  शिकल्या. तिथेच त्यांनी गणित या विषयात पदवी घेतली. अजमेर संगीत महाविद्यालयातून गोविंदराव राजूरकर आणि त्यांचा पुतण्या वसंतराव राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत निपुण अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर वसंतराव राजूरकर यांच्यासोबत त्यांनी विवाह केला.

ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिनिधित्व करणाऱया राजूरकर यांच्यावर के. जी. गिंडे, जितेंद्र अभिषेकी आणि कुमार गंधर्व यांचा प्रभाव होता. राजूरकर यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले.  त्यांना 2001 मध्ये ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. मनमिळावू, प्रेमळ स्वभावाच्या राजूरकर यांच्या निधनाने संगीत विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

‘टप्पा’  अन् ‘तराना’ वरप्रभुत्व

मालिनी राजूरकर यांचे ‘टप्पा’ आणि ‘तराना’ या गायकीवर विशेष प्रभुत्व होते. ‘नरवर कृष्णासमान’ आणि ‘पांडू-नृपती जनक जया’  ही त्यांनी गायलेली दोन मराठी नाटय़गीते लोकप्रिय झाली. त्यांनी देशविदेशात अनेक मैफली गाजवल्या. गुणीदास संमेलन, तानसेन समारोह, सवाई गंधर्व महोत्सव आणि शंकर लाल महोत्सव  या संगीत महोत्सवांमध्ये राजूरकर यांनी त्यांची कला सादर केली.