सेव्ह ट्री सेव्ह लाईफ’ संदेश देण्यासाठी भ्रमंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या  छंदातून स्वतःसाठी काही मिळावे याची अपेक्षा न ठेवता केवळ पर्यावरण रक्षणाचा ‘सेव्ह ट्री सेव्ह लाईफ’ हा संदेश देण्यासाठी वसईचे तीन अवलिया सायकलवरून सफर करीत आहेत. वसई ते काठमांडू हा २ हजार १०० किलो मीटरचा सायकल प्रवास ज्युड डिसोझा, सचिन कवळी व प्रणव राऊत यांनी न थकता १८ दिवसांत पूर्ण केला. या मोहिमेला वसईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.वसईतील ज्युड डिसोझा, सचिन कवळी आणि प्रणव राऊत हे तिघे वसई ते नेपाळ येथील काठमांडूपर्यंत सायकलवरून प्रवासाला निघाले होते.

सामाजिक संदेश

वसई अॅडव्हेंचर या फाऊंडेशनच्या माध्यमातून वसई-विरारमधील शेकडो तरुण-तरुणींनी देश-विदेशातील अनेक टेक मोहिमा, हिमालयीन मोहिमा यशस्वीपणे पार केल्या आहेत. 2015 मध्ये ही स्त्रीभ्रूण हत्या टाळा हा संदेश घेऊन वसई ते काठमांडू सायकल मोहीम केली होती. वसई ते लडाख, वसई ते कन्याकुमारी, वसई ते रामेश्वरम आदी मोहिमेचा समावेश आहे. प्रत्येक सायकल मोहीम ही एक सामाजिक संदेश घेऊन आखली गेली आहे.

तीन अवलियांचा 2 हजार 100 किलोमीटरचा प्रवास

तब्बल 2 हजार 100 सायकल प्रवास हे तिघे 21 दिवसांत पूर्ण करणार होते. वसई ॲडव्हेंचर फाऊंडेशनच्या माध्यमातून या मोहिमेसाठी निघालेल्या या साहसी विरांनी निर्धारित वेळेच्या तीन दिवस आधीच ही मोहीम फत्ते केली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पुढे हिंदुस्थान- नेपाळ सीमा ओलांडून काठमांडू असा खडतर प्रवास त्यांनी केला. प्रत्येकाकडे 25 किलो सामान होते. यात कपडे, सायकलचे स्पेअर पार्ट, ऑईल, ट्यूब आदींचा समावेश होता. माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी या सायकल मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला होता.