मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ पाथर्डीत बैठा सत्याग्रह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज पाथर्डी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने वसंतराव नाईक चौकामध्ये बेमुदत बैठा सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा आंदोलकांनी या वेळी दिल्या.

या आंदोलनात लक्ष्मण डांगे, सोमनाथ बोरुडे, बंडू पाटील बोरुडे, देवा पवार, आप्पासाहेब बोरुडे, रामदास बर्डे, उद्धव माने, सोमनाथ माने,चांद मणियार, संतोष वाघमारे, बबलू वावरे, राजेंद्र नांगरे, विवेक देशमुख, विजय ढाळे, सुनील लाटणे, विष्णुपंत वाखुरे यांनी सहभाग घेतला. या वेळी बोलताना बंडू पाटील बोरुडे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण सुरू असताना शासनाने ते मोडून काढत आंदोलकांना अतिरेकी समजत लाठी हल्ला व गोळीबारही केला. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत एक वणवा पेटला आहे.

जरांगे पाटील यांची रास्ता मागणी असून त्यांचं एकच म्हणणं आहे की सरसकट मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे, हे निर्दयी सरकार आणि पुढारी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून तालुक्यातील सकल मराठा समाजाने वेगवेगळ्या पद्धतीने हे आंदोलन सुरू ठेवले असल्याचे ते म्हणाले. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सत्याग्रहाला उपस्थिती दर्शवून पाठिंबा दिला.