बीएएमएस डॉक्टरांचीही आरोग्य केंद्रांमध्ये नियुक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून आता बीएएमएस केलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार आहे. नियमित वैद्यकीय अधिकारी म्हणून एमबीबीएस उमेदवार उपलब्ध होत नसतील तर वैद्यकीय अधिकारी पदावर बीएएमएस उमेदवारांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला.

यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होईपर्यंत ती पदे बंधपत्रित (बॉण्डेड) म्हणजेच शिक्षणानंतर काही काळ शासकीय सेवेत राहण्यासाठी नियमाप्रमाणे सरकारशी करार केलेल्या एमबीबीएस उमेदवारांमधून भरण्यात यावीत. त्यानंतरही ती पदे रिक्त राहत असतील तर कंत्राटी पद्धतीने एमबीबीएस उमेदवार त्यावर नेमले जावेत आणि त्यानंतरही रिक्त राहिली तर त्या जागांवर बीएएमएस (आयुर्वेदिक मेडिसिन) उमेदवार तिथे कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात यावेत असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.