धनगर समाजाच्या इशाऱ्यानंतर विखेंची कार्यक्रमाला दांडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहरामध्ये आज शासनाच्या वतीने दिव्यांगासाठी मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. पण गेल्या चार दिवसापासून धनगर समाजाने घेतलेल्या भूमिकेमुळे बहुदा आजच्या या कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व भाजपचे खासदार सुजय विखे हे या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यामुळे उलट सुलट चर्चेला आता उधाण आले आहे.

राज्याचे महसूल मंत्री व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे आहे, तर त्यांचा मुलगा डॉक्टर सुजय विखे हे नगरचे भाजप खासदार आहे. चार दिवसांपूर्वी सोलापूर या ठिकाणी घडलेल्या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटण्यास सुरुवात झाली आहे. धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आता या समाजाने विखे यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केलेली आहे. कालच पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे विखे यांना मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात आला तर दुसरीकडे सोलापूर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू झाले आहे.

आज नगर शहरामध्ये समाज कल्याण विभागाच्या व शासनाच्या वतीने दिव्यांगासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले बच्चू कडू या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही विशेष म्हणजे त्यांच्या मुलगा भाजपाचे खासदार सुजय विखे सुद्धा या कार्यक्रमाच्या ठिकाणी फरकले नाहीत. दोन दिवसापासून धनगर समाजाने दिलेल्या या इशारानंतर नगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगले ढवळून निघालेले आहे. त्यातच आता धनगर समाजाने आक्रमक भूमिका घेऊन आगामी काळामध्ये हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे विखेंच्या समोर व भाजपच्या समोर आता एक नवा पेच निर्माण झाला आहे, त्यामुळे आता या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यामुळेच उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.