त्यांचा हा वेळकाढूपणा घटनाबाह्य सरकारला संरक्षण देण्यासाठीच, आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी बुधवारी ट्विटरवरून सभापती राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला. आमदारांच्या अपात्रेतेसंदर्भातील सुनावणीबाबत सभापतींकडून वेळकाढूपणा सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांची ही वेळकाढू रणनीती ही संपूर्ण जग पाहतेय, असा इशारा देखील दिला.

”न्यायाला विलंब होणे हे स्पष्टपणे न्याय नाकारण्यासारखेच आहे. हे फक्त आमच्यासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडून घटनाबाह्य सरकार स्थापन करणाऱ्या भाजपने महाराष्ट्राला अन्यायकारक वागणूक दिली. आता चेंडू सभापती राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे. मात्र तिथे असे दिसते की घटनाबाह्य सरकारचे संरक्षण करण्यासाठी सभापती वेळकाढूपणा करत आपल्या क्षमतेच्या आणि चौकटीच्या पलीकडे जात आहेत. आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचा दावा करत असलेल्या घटनाबाह्य सरकारचे अशा प्रकारे समर्थन केले जाते हे पाहणे खेदजनक आहे. सभापती लवकरच घाना येथील राष्ट्रकुल संसदीय परिषदेला भेट देणार आहेत, परंतु ते कोणत्या आधारावर अशा राज्याचे प्रतिनिधित्व करतील जिथे सरकारच घटनाबाह्य आहे आणि बेकायदेशीर मार्गांनी संरक्षित आहे? यामुळे जागतिक स्तरावर देशाची बदनामी होत असून, लोकशाही ही भूतकाळातील गोष्ट असल्याचे संकेत देत आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने मे 2023 मध्ये आदेश दिलेला असतानाही, सभापती लवकर न्याय देतील, अशी आम्हाला आशा आहे. हे एका पक्षाबद्दल नाही तर महाराष्ट्राविषयी आणि ते राज्याला कसे वागतील तसंच राज्यातील जनतेबद्दल आणि लोकशाहीबद्दल आहे. राज्यातील हा महत्त्वाचा निर्णय होईपर्यंत संसदीय परिषदेसाठी परदेश दौरा करणे चुकीचे ठरेल. त्यांची ही वेळकाढू रणनीती म्हणजे घटनेच्या विरोधात असलेल्यांना संरक्षण देण्यासारखी आहे. महाराष्ट्र पाहत आहे. भारत पाहत आहे. जग पाहत आहे, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.