
संपूर्ण देशावर मेहेरबान असलेला पाऊस यंदा मराठवाड्यावर रुसला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर तब्बल दोन महिने पावसाने खंड दिला. गणेशोत्सवात पाऊस बहार करेल ही आशाही फोल ठरली. गायब झालेला पाऊस आता पुन्हा परतणार असून, मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
यंदा पावसाने चातकाप्रमाणे वाट बघायला लावली. पाऊस आला, पाहुण्यासारखा एक-दोन दिवस मुक्काम करून लगेच परतला. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले. खरीप हंगाम हातचा गेला. सोयाबीन, कापूस, मका आदी पिके खुरटली. पोळ्यानंतर गणेशोत्सवात पावसाची वाट होती. मात्र एक- दोन दिवस हजेरी लावून पाऊस बेपत्ता झाला.
पाऊस आता परतीच्या प्रवासाला लागला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह खान्देश, पश्चिम महाराष्ट्राला हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला असून, मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेडसह लातूर, धाराशिव या आठही जिल्ह्यांत पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
बुधवारपासून हस्त नक्षत्र लागले असून, या नक्षत्राचे वाहन बेडूक आहे. त्यामुळे भरपूर पाऊस असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

























































