दादर-परळदरम्यान तांत्रिक बिघाड; सकाळी गर्दीच्या वेळी लोकल अर्धा तास ठप्प प्रवाशांनी ट्रकमधून पायपीट करत गाठले परळ स्थानक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावर दादर-परळ स्थानकादरम्यान सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सुमारे अर्धा तास लोकल वाहतूक ठप्प होती. ऐन गर्दीच्या वेळी सकाळी झालेल्या या बिघाडामुळे प्रवाशांना ट्रकमध्ये उतरून पायपीट करत परळ स्थानक गाठावे लागेल. त्यामुळे प्रवाशांनी नेहमीच होणाऱया रेल्वेच्या बिघाडाबाबत संताप व्यक्त केला.

सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू असतानाच पावणेदहाच्या सुमारास सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने धिम्या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. त्याबाबत कोणतीच उद्घोषणा होत नसल्याने आणि गाडीही पुढे जात नसल्याने प्रवाशांनी रेल्वे ट्रकमध्ये उतरून परळ स्थानक गाठत पश्चिम रेल्वेच्या लोकलने कार्यालय गाठले. लोकलचा जवळपास अर्धा तास खोळंबा झाला. त्यामुळे अप मार्गावरून परळच्या दिशेने येणाऱया लोकल अडकून पडल्यामुळे प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले. अनेकांना कार्यालयात लेटमार्क लागला. दरम्यान, सदरचा बिघाड पंधरा-वीस मिनिटांत दुरुस्त करून लोकल वाहतूक पूर्ववत केल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज कुठेना कुठे तांत्रिक बिघाड होऊन लोकल वाहतुकीचा खोळंबा होत असून त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे प्रवासी रेल्वेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.

पश्चिम रेल्वेचाही खोळंबा
पश्चिम रेल्वे मार्गावर सायंकाळी दहिसर स्थानकात एक प्रवासी लोकलसमोर आल्याने अपघात झाला. त्याचाही परिणाम लोकल वाहतुकीवर झाला असून बोरिवली-विरारदरम्यान अनेक गाडय़ा अर्धा तास विलंबाने धावत होत्या. त्यामुळे घरी परतणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रात्री उशिरापर्यंत याचा परिणाम जाणवत होता.