
>> दिलीप ठाकूर
गीतकार, पटकथा लेखक व दिग्दर्शक रवींद्र पीपट यांचे अलिकडेच मुंबईत निधन झाले. राज कपूर दिग्दर्शित ‘प्रेमरोग’च्या वेळेस तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत होता आणि त्याच वेळेस त्याने आर. के. फिल्म निर्मित व राहुल रवैल दिग्दर्शित ‘बीवी ओ बीवी’चे पटकथा लेखन केले. मराठीतील लोकप्रिय साहित्यिक प्रभाकर ताह्मणे यांच्या एका विनोदी कथेवर आधारित ही पटकथा होती आणि या चित्रपटात संजीव कुमार, रणधीर कपूर, पूनम धिल्लॉन, योगिता बाली इत्यादींच्या भूमिका आहेत. आर. के. परिवारातील एक अशीच रवींद्र पीपटची ओळख होती आणि त्याच्या दिग्दर्शन पदार्पणातील ‘लाव्हा’ या चित्रपटात राजीव कपूर आणि त्याच सुमारास अभिनयात पुनरागमन केलेली डिंपल कापडिया होती. तिने अतिशय प्रभावीपणे यात ‘सूडनायिका’ साकारलीय. व्हिलन राज बब्बर होता, पण रसिकांना चित्रपट आवडला नाही. तरी नाउमेद न होता रवींद्र पीपटने ‘वारीस’चे दिग्दर्शन केले. मध्यवर्ती भूमिकेत स्मिता पाटील आणि जोडीला राज बब्बर, अमृता सिंग, राज किरण, अमरीश पुरी, कुलभूषण खरबंदा, जावेद खान, सुषमा सेठ, सुधीर पांडे आणि प्रदीप कुमार अशी मोठीच स्टारकास्ट. नायिकाप्रधान कथानक आणि स्मिता पाटीलने भरपूर मेहनत घेतली. तिचे अचानक निधन झाले आणि आता तिचे राहिलेले डबिंग कोणाकडून करून घेणार हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला. सुदैवाने तिचं शूटिंग पूर्ण झालं होतं. रेखाने तेव्हा स्मिता पाटीलसाठी डबिंग केले आणि स्मिता पाटीलचे शब्दोच्चार, संवादफेक, चढउतार यांचा प्रत्यय दिला. रवींद्र पीपटचेही त्यात कसब दिसले.
रवींद्र पीपटने स्त्राr व्यक्तिरेखांना प्राधान्य असलेले चित्रपट प्रामुख्याने दिग्दर्शित केल्याचे दिसून येईल. ‘घर आया मेरा परदेसी’, ‘हम तो चले परदेस’, ‘कैद मे है बुलबुल’, ‘काश आप हमारे होते हे त्याचे महत्त्वाचे चित्रपट. याशिवाय त्याने ‘आओ प्यार करे’ तसेच ‘अपनी बोली अपना देस’, ‘कचेहरी’ या पंजाबी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘कचेहरी’ या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाल्याने रवींद्र पीपटच्या गुणवत्तेवर जणू शिक्कामोर्तब झाले, पण त्याच्या हिंदी चित्रपटांतील काही कलाकारांच्या व्यावसायिक घसरणीचा त्याला फटका बसला.
रवींद्र पीपट कधी गीतलेखनही करायचा. ‘मिल गये हम और तुम’ (हम तो चले परदेस’), ‘घर आया मेरा परदेसी’ (‘घर आया मेरा परदेसी’) ही त्याचीच गाणी आणि तो गीतलेखन करायचा म्हणून त्याच्या काही चित्रपटांची नावे लोकप्रिय गाण्यांचे मुखडे असत. त्याला संगीताचा उत्तम कान होता हे त्याच्या दिग्दर्शनातील काही चित्रपटांत दिसले. ‘लाव्हा’तील गाणी (गीतकार आनंद बक्षी व संगीत राहुल देव बर्मन) लोकप्रिय झाली. ‘दिल क्या है’ (पार्श्वगायक किशोर कुमार, आशा भोसले व शैलेंद्र सिंग), ‘हम तुम दोनों मिल के’ (लता मंगेशकर व किशोर कुमार), ‘जीने दे ये दुनिया’ (आशा भोसले व मनमोहन सिंग), ‘कुछ लोग मुहब्बत कर के’ (किशोर कुमार) या गाण्यांतून रवींद्र पीपटने ‘लाव्हा’ रोमांचक नाटय़मय केला. ‘वारीस’मध्येही त्याने तोच प्रत्यय दिला. वर्मा मलिक यांच्या गीतांना उत्तमसिंगचे संगीत होते. यातील ‘तेरे प्यार की उमर है कितनी सनम’ (लता मंगेशकर व मनमोहन सिंग), ‘हुस्न की वादीयों मे’ (लता मंगेशकर व किशोर कुमार), ‘झोली मे हिरे तेरे’ (लता मंगेशकर) या गाण्यांतून ‘वारीस’ अधिकाधिक रंगतदार झाला होता. छायाचित्रणकार मनमोहन सिंग यांना यात पार्श्वगायनाची चांगलीच संधी मिळाल्याचे दिसून येईल. याच गीत, संगीताच्या कौशल्यातून त्याने ‘लाल दुपट्टा मलमल का’ इत्यादी व्हिडीओपटांचे दिग्दर्शन करून भरपूर यश संपादले. तसा तो सतत धडपड करणारा असल्यानेच त्याला हे छोटय़ा पडद्यावरही रमणे जमले. रवींद्र पीपट हा गुणवत्ता असलेला गीतकार, पटकथा लेखक व दिग्दर्शक. आपल्या गुणवत्तेला त्याने न्याय देण्याचा प्रयत्न मात्र केला होता.






















































