
>> रश्मी वारंग
सहज करून बघावं म्हणून एखादा स्वयंपाकी काहीतरी प्रयोग करून पाहतो आणि बघता बघता तो प्रयोग यशस्वी होत पदार्थ लोकप्रिय होतो, असं भाग्य फारच कमी पदार्थांच्या वाटय़ाला येतं. अशीच अपघाताने जन्माला येऊन सुप्रसिद्ध झालेली मिठाई म्हणजे म्हैसूर पाक. या पाकाची ही मुरलेली गोष्ट.
म्हैसूरचे राजा कृष्णराज वड्डीयार म्हणजे एकदम खवय्ये. रोजच्या जेवणात त्यांना काही ना काही गोड लागत असे. त्यांची ही आवड लक्षात घेऊन त्यांचा मुख्य आचारी काकासूर मदप्पा नवनवे प्रयोग करून पाहत असे. 1935 सालातील गोष्ट. म्हैसूरच्या अंबाविलास पॅलेसमध्ये मदप्पाने असाच प्रयोग करता करता बेसन पीठ, तूप आणि साखर यांच्यापासून एक पदार्थ बनवून पाहण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात मदप्पाला खीरसदृश काही बनेल अशी अपेक्षा होती. कृष्णराज वड्डीयार राजाच्या पानात त्याने तसंच मिश्रण वाटीतून दिलं, पण प्रत्यक्षात ताट राजाच्या दालनात नेई नेईपर्यंत ते खिरीसारखं मिश्रण घट्ट होऊन वडीसारखं दिसू लागलं. हे राजाला आवडेल अथवा नाही याची मदप्पाला चिंता असताना पहिल्याच घासाने कृष्णराज वड्डीयार यांचं मन खुश झालं. तो पदार्थ आवडल्याचे त्यांनी मदप्पाला सांगितलं. या पदार्थाचे नाव काय? असा प्रश्न आला. कन्नड भाषेत पाक म्हणजे साखरेपासून बनवलेली मिठाई. त्या काळी खास करून गोड पदार्थ तयार करणाऱया आचाऱयाला ‘नलपाक’ म्हटलं जायचं. ही नवी पाककृती म्हैसूरच्या राजवाडय़ात जन्माला आली होती. त्यामुळे मदप्पाने या पाककृतीला ‘म्हैसूर पाक’ असं नाव दिलं.
राजा कृष्णराज वड्डीयार अतिशय उमद्या दिलाचा राजा होता. त्या मुदपाकखान्यात ब्रिटिशांच्या पाककृतींपासून ते अस्सल हिंदुस्थानी चवीचं सगळं काही बनत असे. राजेरजवाडय़ांना खास त्यांच्यासाठी तयार होणाऱया पाककृती सामान्य लोकांपासून लपवून ठेवायची हौस असताना कृष्णराज वड्डीयार यांना मात्र हा म्हैसूर पाक सामान्य जनतेनेही चाखला पाहिजे असं मनापासून वाटलं. त्यांनी मदप्पाला हा पदार्थ दुकानातून विकण्याची अनुमती दिली. मदप्पाने स्वतःचं मिठाईचं दुकान थाटलं आणि ही राजेशाही पाककृती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली. मदप्पाचे वंशज आजही हे दुकान चालवतात.
आज दक्षिणेकडे ‘म्हैसूर पाक’ मिठायांचा राजा मानला जातो. लग्न समारंभ, डोहाळे जेवण यात म्हैसूर पाक अनिवार्य पदार्थ आहे. दसऱयाला दक्षिण ंिहदुस्थानात दहा दिवसांत 51 पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. त्यात म्हैसूर पाकचा मान मोठा आहे.
मूळच्या पाककृतीला आताच्या बल्लवाचार्यांनी विविध फ्लेवर्सनी आणखी सजवलं आहे, पण काही दुकानांत अगदी मूळ पाककृतीसुद्धा मिळते. म्हैसूर पाकचा पाक बनवणं ही एक अतिशय जिकरीची आणि कौशल्याची गोष्ट. त्यात जरा काही कमी जास्त झालं तर पाकाचा सत्यानाश! त्यामुळे प्रसिद्ध खानसामे त्यांची पाक बनवण्याची कृती लपवून ठेवतात. ही पाककृती आज देशभरात बनवली जाते.
असा हा राजवाडय़ातून खास आदमी से आम आदमी झालेला म्हैसूर पाक म्हणजे एका विशिष्ट प्रांताचं नाव मिरवूनही संपूर्ण देशभरात लोकप्रिय झालेल्या पदार्थांचा आदर्शच. पाकाप्रमाणे हिंदुस्थानींच्या मनात मुरलेला म्हैसूर पाक.
दीर्घकाळ टिकणारी मिठाई
म्हैसूर पाकाशिवाय मिठाईचं दुकान संभवतच नाही. त्यातील तुपाच्या प्रमाणानुसार म्हैसूर पाकाचा कडक किंवा मऊपणा ठरतो. काही ठिकाणी अगदी मऊ लादीसारखा म्हैसूर पाक मिळतो, तर काही ठिकाणी तो जाळीदार कडक तुकडा होतो, पण पाण्याचा अंश नसल्याने दीर्घकाळ टिकणारी मिठाई म्हणून म्हैसूर पाकला पहिली पसंती मिळते. गावी नेण्यासाठीची मिठाई म्हणून म्हैसूर पाक लोकप्रिय आहे तो याच कारणासाठी.


























































