
26 ऑक्टोबरपासून मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या 500 हून अधिक परीक्षा सुरू झाल्या आहेत. या परीक्षा सुरू होण्याआधी विद्यापीठाने विषयनिहाय अभ्यास मंडळ (बोर्ड ऑफ स्टडीज) नियुक्त करणे आवश्यक होते. मात्र परीक्षा सुरू झाल्यावर विद्यापीठाला अभ्यास मंडळाची आठवण झाली आहे. काही विषयांच्या अभ्यास मंडळाची रचना करण्यात येत असून त्यासाठी प्राध्यापकांना नियुक्तीचे पत्र पाठविण्यात आले आहे. मात्र यातही विद्यापीठाने गोंधळ घातला आहे. ज्या प्राध्यापकांनी विषय शिकविलाच नाही अशा प्राध्यापकांना अभ्यास मंडळावर नियुक्त केले आहे.
‘मुक्ता’ शिक्षक संघटनेने अभ्यास मंडळावरील चुकीच्या नियुक्तीबाबत थेट कुलपती राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 मधील कलम 40 नुसार प्रत्येक विषयासाठी किंवा विषयांच्या गटासाठी एक अभ्यास मंडळ असणे आवश्यक आहे, मात्र विद्यापीठाने परीक्षा सुरू झाल्या तरी अभ्यास मंडळाची स्थापनाच केलेली नाही. आता ऐन परीक्षा काळात विद्यापीठाने अभ्यास मंडळ स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या त्यातही गोंधळ घातल्याचा आरोप ‘मुक्ता’ संघटनेने राज्यपालांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.
अभ्यास मंडळ नियुक्तीची जबाबदारी प्र-कुलगुरूंची
अभ्यास मंडळे नेमणुकीची संपूर्ण जबाबदारी ही विद्यापीठ कायद्याप्रमाणे प्र-कुलगुरूंवर असते. परंतु मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू अजय भामरे यांची नेमणूकच वादाच्या भोवऱयात सापडली आहे. ‘मुक्ता’ संघटनेने भामरे हेच प्र-कुलगुरू पदाला पात्र नाहीत, त्यांचेकडे संशोधनाचे मापदंड उपलब्ध नाहीत. त्यामुळे अभ्यास मंडळावर नेमक्या कोणत्या व्यक्ती असाव्यात याची त्यांना पुरेशी समज नाही, म्हणूनच त्यांनी केवळ मर्जीतल्या आणि ज्यांनी विषय शिकवलेले नाहीत अशा प्राध्यापकांना अभ्यास मंडळावर नियुक्त केले असल्याचा आरोपही ‘मुक्ता’ संघटनेचे महामंत्री प्रा. सुभाष आठवले यांनी राज्यपालांकडे केला आहे.




























































