
यशस्वी स्कील ऑफ अकादमी यांच्याकडून डाटा एंट्री ऑपरेटरवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून डाटा एन्ट्री ऑपरेटरना कायमस्वरूपी कामावर घ्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र डाटा एंट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत काम बंद आंदोलन केले.
डाटा एंट्री ऑपरेटरनी दिलेल्या निवेदनात यशस्वी स्कील ऑफ अकादमी यांच्यामार्फत दोन वर्षांपासून डाटा एंट्री ऑपरेटर आरोग्य विभागात शिकाऊ उमेदवार म्हणून कार्यरत आहेत. हे शिकाऊ उमेदवार आता कामात निपूण झाल्यावर अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे या झालेल्या अन्यायाविरोधात डाटा एंट्री ऑपरेटरनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत काम बंद आंदोलन छेडले.
या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष सौरभ तारवे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घावत, जिल्हा कोषाध्यक्ष श्वेतांबरी भोसले, जिल्हा सचिव सुजीत भागवत सहभागी झाले होते. या बेमुदत काम बंद आंदोलनात विविध मागण्या मागितल्या आहेत. त्यामध्ये सर्व कंत्राटी डाटा ऑपरेटरना एनएचएम अंतर्गत समायोजन करून घ्यावे. मासिक मानधनात वाढ करून शासन परिपत्रकानुसार 18 हजार रुपये इतके मानधन देण्यात यावे. मानधनात दरवर्षी 5 टक्के वाढ करावी, बाह्यस्त्रोत कंपनी घेत असलेल्या कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटरच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या आंदोलनात घेण्यात आला आहे.
























































