
>> विनायक
दिवाळी जवळ येतेय. घरोघर विविध पदार्थांची तयारी सुरू झाली असेल तेव्हा काही लेखांमधून स्वयंपाकघरात परंपरेने आणि आताच्या आधुनिक पद्धतीने वापरल्या जाणाऱया काही नित्योपयोगी वस्तूमागचं विज्ञान समजून घेऊ. या गोष्टी एवढय़ा ‘युजर फ्रेंडली’ पद्धतीने बनवल्या गेल्या की, कोणीही गृहिणी त्यांचा सहजतेने वापर करू शकत होती. त्यामागचं थोडंसं तंत्रज्ञान शिकून प्रसंगी त्या वस्तू दुरुस्तही करत होती.
आज साठीच्या आसपास असलेल्यांना ‘फरफर’ आवाज करणाऱया ‘प्रायमस’ कंपनीचा ‘स्टोव्ह’ आठवत असेल. सामान्यतः त्याला ‘स्टो’ किंवा ‘ष्टो’ म्हटलं जायचं. स्टोव्ह किंवा अगदी इंग्लिश उच्चार ‘स्टव्ह’ कुणाला येत होता नि त्याची गरजही नव्हती. इंग्रजांना तरी आपल्या भाषेतले उच्चार इथे दीडशे वर्षे राहून कुठे धड येत होते?… तर ‘ष्टो’ची गोष्ट! ती अगदी रंजक आहे. स्टोव्ह घराघरांत पोचला तरी त्यामागची कथा जाणून घ्यायची आवश्यकता भासण्याचं कारण नव्हतं. आज अस्तंगत होत चाललेल्या, पण एकेकाळी स्वयंपाकघराचा राजा असणाऱया ‘फरफऱ्या स्टो’ची कहाणी उत्सुकतेपोटी जाणून घेऊ या. त्यात विज्ञान आहे आणि रंजकताही.
या स्टोव्हसाठी वापरलं जाणारं केरोसिन किंवा पॅरॅफिन अथवा साध्या भाषेत रॉकेल एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात घराघरातलं इंधन झालं. तोपर्यंत झाडी, लाकडी आणि शेणामातीच्या बदामी अशा कोळशांचा तसंच लाकूडफाटय़ाचा वापर चूल पेटवण्यासाठी व्हायचा. तो ‘मेकॅनिझम’ एकदम साधा. तीन दगडांची चूल माळरानावरही ‘मांडता’ यायची. काटक्याकुटक्या गोळा करून जाळ केला की, वर ठेवलेल्या मडक्यात अन्न शिजायचं. हा अगदी प्राथमिक स्टोव्ह. कारण स्टोव्ह म्हणजेच चूल. पुढे तो ‘बर्नर’चा झाला आणि आता गॅसचाही बर्नर असतोच. तसंच गॅसची ‘शेगडी’ असंच आपण म्हणतो. शेकणे म्हणजे गरम करणे यावरून ‘शेगडी’ शब्द उत्क्रांत झाला असावा. केरोसिनचा सर्रास वापर सुरू झाल्यावरही त्याद्वारे पेटवलेल्या ज्वालेवर भांडी ठेवताना ती काळी पडायची. त्यावर कार्बनची काजळी धरायची. पूर्ण ज्वलन होऊन ज्योत निळी दिसत नाही तोपर्यंत अर्धज्वलनाच्या पिवळ्या ज्योतीतून कार्बन बाहेर पडतोय हे सर्वांना अनुभवाने ठाऊक होतं. त्यावर विचार करताना प्रॅन्स विल्हेम लिन्डक्विस्ट (लिन्डकिस्ट) यांनी 1892 मध्ये अनेक प्रयोगांती केरोसिनचं प्रेशराइज्ड व्हेपरमध्ये (दाबजन्य वाफेत) रूपांतर करणारं ‘बर्नर’ बनवून प्रथमच ‘प्रायमस’ या नावाने क्रांतिकारी फरफऱया स्टोव्ह जगापुढे आणला. आपल्या या संशोधनाला विलक्षण जागतिक मान्यता आणि उपयोगिता प्राप्त होईल असं त्या वेळी लिन्डकिस्ट यांनाही वाटलं नसेल, पण त्यांच्या ‘प्रायमस’ने स्टोकहोम (स्वीडन) येथील कारखान्यातून बाहेर पडताच जगभरची स्वयंपाकघरं जिंकली. जिथे रॉकेल सहज उपलब्ध आहे अशा ठिकाणी रांधण्याचं कष्टप्रद काम करणाऱया चुलीच्या धुराने त्रास होणाऱया असंख्य गृहिणींचं जीवन त्यांनी सुखी केलं.
नव्याला विरोध करणं हासुद्धा मनुष्य स्वभावच. ‘‘रॉकेलवर काय शिजवायचं?’’ असा प्रश्न विचारला जायचाच. चुलीवरच्या अन्नाची चव छान असते हेही मान्य, पण आयुष्याला वेग आला आणि औद्योगिक क्रांतीनंतर शहरं वाढायला लागली तेव्हा चुलीऐवजी सहज पेटवता येणारा रॉकेलवर चालणारा ‘प्रायमस’ आवश्यक झाला. पुढे तेवढाही वेळ वाचवणारा कुकिंग गॅस आला. लिन्डकिस्ट यांनी जॉन व्हेन्सन यांच्यासह भागीदारीत ‘प्रायमस’ स्टोव्हचं पेटन्ट घेतलं आणि ‘स्टोव्ह’ऐवजी ‘अरे वा! तुम्हीसुद्धा ‘प्रायमस’ घेतला वाटतं?’ असे कौतुकाचे प्रश्न विचारले जाऊ लागले. माझ्या पिढीने बालपणी तो काळ जवळून पाहिलाय.
या ‘स्टोव्ह’मागचं विज्ञान त्यातील बर्नरमध्ये कसं दडलंय ते थोडक्यात सांगायचं तर, रॉकेलच्या साडेआठ इंचाचा (22 से.मी. व्यासाच्या) आणि 9 सें.मी. उंचीच्या पितळी टाकीत भरलेल्या 1.1 लिटर रॉकेलवर हा स्टोव्ह चालायचा. टाकीला तीन भक्कम पाय, हवा भरायला पम्प, वर भांडे ठेवायची तबकडी आणि मधोमध, रॉकेलची उष्णतेने ‘वाफ’ आणि त्यातून निळी ज्वाला निर्माण करणारा बर्नर ‘फरफर’ आवाज करत व्यवस्थित पेटल्याची द्वाही फिरवायचा. हा ताब्यांचा बर्नर मोठय़ा नळीने खालच्या टाकीला जोडलेला असायचा. पम्पाने हवा भरून टाकीतील रॉकेलवर दाब आणून ते ‘कॉप्रेस’ केल्यावर बर्नरच्या बारीक बाह्य नळ्यांमधून वर जायचं. बर्नरच्या तळाशी असलेल्या आणि आधीच काकडा आणि आकडा स्पिरीटने पेटवून गरम केलेल्या या नळ्यांमधील रॉकेलचं दाब व उष्णतेने ज्वालाग्रही ‘वाफेत’ रूपांतर व्हायचं. बर्नरच्या मध्यभागी मधोमध असणाऱया ‘नॉझल’ पिंवा ‘निपल’मधून ती प्रेशराइज्ड वाफ बाहेर पडताना हवेतील ऑक्सिजनशी (प्राणवायूशी) संयोग पावून पेट घ्यायची आणि निळी ज्योत वर उसळायची. नॉझलमध्ये कचरा, काजळी अडकली असल्यास ते साफ करणाऱया पिना तसंच नॉझल बदलायचं तर ते काढता येईल असा विशिष्ट ‘पाना’ मिळायचा. हा उद्योग आम्ही घरीच करायचो. कालांतराने ‘प्रायमस’ची ‘फरफर’ शांत करणारे जाळीदार ‘सायलेन्सर’ आले. ते बर्नरवर बसवण्यात केवढं अप्रूप आणि त्यांचही कोण काwतुक!


























































