
मणिपूरमध्ये काही महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. यात अनेकांनी जीव गमावला आहे. दरम्यान आता दोन किशोरवयीन बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. मणिपूरमधील इंफाळ पश्चिम जिल्ह्यातून दोन किशोरवयीन बेपत्ता झाले आहेत. यानंतर पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मैबाम अविनाश आणि निंगथौजम अँथनी अशी या दोघांची नावे आहेत. ते रविवारी सकाळी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दुचाकीवरून इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील सेकमाई भागात गेले होते मात्र ते घरी परतले नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी सगळीकडे शोधाशोध सुरु केली. मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांना धाव घेतली. या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान याप्रकरणात सशस्त्र कुकींचा सहभाग असल्याचा त्यांना संशय व्यक्त करण्यात आला आहे. दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांनी राज्यपाल अनुसुया उईके यांची भेट घेतली आहे. मुलांच्या पालकांनी त्यांचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्वरीत कारवाई करावी अशी मागणी केली. आता याबाबत मुख्यमंत्री एन बिरेन यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे या पालकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. राजभवनने जारी केलेल्या निवेदनानुसार, पालकांना आश्वासन दिले की बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी ते सर्वतोपरी मदत केली जाईल.
दरम्यान या मुलांचे कांगपोकपी जिल्हा ओलाडल्यानंतर लागणाऱ्या सेनापती जिल्ह्यातील पंपाजवळ काळ्या पॉलिथिनच्या पॅकेटमध्ये गुंडाळलेले फोन आढळून आले. ते पोलिसांनी जप्त केले असून या दोघांचा कांगपोकपी जिल्हा पोलीस, आसाम रायफल्स आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांच्याकडून शोध घेतला जात आहे.


























































