बिछान्यामधून ‘कांबळ’ होणार आऊट; कैद्यांना पांघरायला मिळणार मुलायम डायमंड चादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कारागृहातील कैद्यांना आता आणखी आरामदायी झोप घेता येणार आहे. त्यांना बिछान्यामध्ये पांघरुण घेण्यासाठी मिळणारी कांबळ गैरसोयीची ठरत असल्याने कैद्यांच्या बिछान्यातून कांबळ बाहेर होणार आहे. त्याऐवजी कैद्यांना पूर्णपणे सुती असलेली डायमंड चादर पांघरुण घेण्यासाठी मिळणार आहे.

सद्यस्थितीत कारागृहातील कैद्यांना दरी, कांबळ व उशी बिछाना म्हणून पुरविण्यात येतात. त्यामध्ये कांबळ (पांघरण्याची चादर) ही सूत व लोकर या दोन्हीपासून बनविण्यात येते, परंतु त्यामध्ये लोकरीचे प्रमाण जास्त असल्याने हे पांघरुण कारागृहाच्या भौगोलिक परिस्थितीत बंद्यांना सुसह्य ठरत नसल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, कारागृह विभागातल्या अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कारागृह विभागातील सुरक्षा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्याबरोबरच कैद्यांच्या मूलभूत गरजांबाबत चर्चा झाली.

त्यावेळी कैद्यांना झोपण्याकरिता अंथरुण व पांघरुण देण्याबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली असता काही ठिकाणी पांघरुण (कांबळ) हे कैद्यांकरिता गैरसोयीचे ठरत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कैद्यांना देण्यात येणाऱया बिछान्यामध्ये सुधारणा करताना कारागृहातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून यापुढे ‘कांबळ’ऐवजी कारागृहातच तयार होणारी पूर्णपणे सुती (कॉटन) ‘डायमंड चादर’ ही पांघरुण म्हणून वापरण्यास देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता कैद्यांना कांबळऐवजी सुती कपडय़ाची डायमंड चादर पांघरुण म्हणून वापरता येणार आहे.