नगरमध्ये दोन दिवसांत 65688 कुणबी नोंदी प्रशासनाच्या हाती, समितीचे युद्धपातळीवर काम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- प्रातिनिधीक

मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी कुणबीचा इम्पिरिकल डेटा शोधण्याची मोहीम जिह्यात युद्धपातळीवर सुरू झाली आहे. मंगळवारअखेर 65,688 प्रमाणपत्रांच्या कुणबी नोंदी जिल्हा प्रशासनाच्या हाती आल्या आहेत. आता उद्यापासून यामध्ये दुपटीने वाढ होईल, असा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे.

समितीमध्ये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व सहायक आयुक्त (नगर महापालिका), तालुकास्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मराठवाडय़ात कुणबी नोंद शोधमोहीम राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याबरोबर तालुकास्तरावर कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन केला असून, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील या कक्षाचे सदस्य सचिव आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दोन दिवसांत प्राथमिक शाळांमधील शाळा सोडल्याच्या रजिस्टरमधील 11 लाख 14 हजार 958 नोंदणी तपासल्या असून, यात 4,011 जणांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. तर जात प्रमाणपत्र वैधता विभागाने 52 हजार 677 जणांना कुणबीचे प्रमाणपत्र दिलेले आहे. अशाप्रकारे जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत 65 हजार 688 जणांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदीची माहिती प्राप्त झाली आहे. यासह महसूल, पोलीस यंत्रणा, खरेदी दस्तावेज, नगर शहरातील वस्तुसंग्रहालय, जन्म-मृत्यूच्या नोंदींचा रेकॉर्ड यांचा शोध घेण्यात येत आहे.

नगर जिह्यात लाखोंच्या घरात कुणबीच्या नोंदी सापडण्याचा अंदाज प्रशासनाला आहे. सर्व शासकीय विभागांत याबाबतची माहिती जमा करण्यात येत असून, येत्या दोन दिवसांत हा आकडा अंतिम होण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाला आहे. जिह्यात आढळणाऱया कुणबीच्या नोंदींची माहिती संकलित झाल्यावर ती राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे.