
>>संजीव साबडे
रेस्टॉरंटमध्ये न जाता आणि बाहेरच कुठे तरी उभ्या उभ्या खाता येतील असे अनेक चमचमीत व चटकदार प्रकार सर्वत्र मिळतात. अलीकडील काळात सर्व वयोगटांत लोकप्रिय होत चाललेला बरिटो, फ्रँकी, टाको या रोलचा प्रवास हा थोडासा सँडविचपूर्वीचा आणि बराचसा सँडविचनंतरचाही आहे.
दिवाळीचा फराळ बहुधा संपला असेल किंवा चहाबरोबर चकली, चिवडा संपवणे सुरू असेल. पण आठवडा-दहा दिवस हेच प्रकार आपल्या आणि इतरांच्या घरात, ताटात पाहून व खाऊन नाही म्हटले तरी काहीसा कंटाळा येतो. काहीतरी अगदी वेगळे, भन्नाट व चटकदार खाण्याची इच्छा अनेकांच्या घरात व्यक्त केली जाते. दरवर्षी दिवाळीनंतर कैक लोकांच्या बाबतीत असेच होते. रेस्टॉरंटमध्ये न जाता आणि बाहेरच कुठे तरी उभ्या उभ्या खाता येतील असे अनेक चमचमीत व चटकदार प्रकार सर्वत्र मिळतात. अलीकडील काळात सर्व वयोगटांत लोकप्रिय होत चाललेला प्रकार म्हणजे फ्रँकी.
फ्रँकी हा तसा बनवण्यास खूपच सोपा प्रकार. घरात पोळी, चपाती न खाणाऱया लहान मुलांना आई हा प्रकार वर्षानुवर्षे देत आली आहे. पोळीच्या आत कांदा-टोमॅटोची भाजी किंवा बटाटय़ाची भाजी, ऑफिस व शाळेत जाणाऱयांसाठी घाईत पटकन चपातीत आम्लेट असे कित्येक वर्षे आया-बहिणी करत आल्या आहेत. एकटय़ाने राहणारे बहुतांशी पुरुष असेच रोल करून खातात व डब्यांमध्ये हे रोल दिसतात. कोलकात्यात तर आपल्या वडापावप्रमाणे रोल ठिकठिकाणी मिळतो. या कोलकाता रोलमध्ये आम्लेट, चिकन वगैरे असते, पण व्हेज म्हणजे भाज्यांच्या सँडविचप्रमाणे रोल खाणारे खवय्ये सतत वाढत आहेत. मुंबईतही कोलकाता रोल व काटी रोल हा प्रकार लोकप्रिय झाला आहे. अंधेरी पश्चिमेला गेली कित्येक वर्षे संध्याकाळी कोलकाता रोलची गाडी लागते. भिमा कोलकाता रोल हे नाव. पवई प्लाझापाशी आणि दिंडोशी येथे, तसेच जे. जे. हॉस्पिटलपाशी कोलकाता एग रोल, कांदिवलीच्या आकुरली रोडवर कोलकाता चायनीज रोल मिळतो. वाशी, घणसोली, ठाणे, वांद्रे, खार अशा ठिकाणी असंख्य स्टॉल, दुकाने व हातगाडय़ांवर कोलकाता रोल मिळतो. कोलकाता रोल हा मुख्यत रस्त्यांवर खाऊन पोट भरणाऱयांचा आवडीचा प्रकार. आता जवळपास सर्व देशांमध्ये पराठा, नान, टॉर्टीला असे गहू व मैद्याचे चपाती-रोटीसदृश्य प्रकार बनतात आणि मिळतात. तुर्कस्तान व असंख्य आखाती देशांत रोटी, नान व मटण हे मुख्य खाणे आहे. त्यामुळे तिथे असाच रोल लोकप्रिय झाला. तुर्की रोल हा पिटा रोल म्हणून प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. रोटीला विविध सॉस लावून त्यावर कबाब व मटणाचे तुकडे आणि कांदा, टोमॅटो, काही भाज्या ठेवतात आणि हा रोल तयार होतो. पिटा रोलची रोटी मैद्याची असते, तर टाको या रोलसारख्या प्रकारासाठी मक्याचे पीठ वापरतात. मुंबईतील अमरजीतसिंग टिब्ब नावाच्या गृहस्थांनी 1969 साली म्हणजे 54 वर्षांपूर्वी फ्रँकीला जन्म दिला. पहिली फ्रँकी विकली गेली पवईत. हे गृहस्थ लेबेनॉनला गेले होते. तेथील पिटा रोल पाहून त्यांनी हा प्रकार मुंबईत तयार करण्याचे ठरवले. त्यांनी याला फ्रँकी नाव देताना त्याचे पूर्णत हिंदुस्थानीकरण केले. वडापावप्रमाणे फ्रँकीची जन्मभूमी मुंबईच, पण ती लोकप्रिय व्हायला बरीच वर्षे लागली.
आता मात्र रस्त्यारस्त्यांवर, नाक्यानाक्यांवर आणि अनेक हॉटेलांत ती मिळते. शिवाजी पार्कजवळ टिब्ब फ्रँकी स्टॉल आहे. दादरला कबुतरखान्यापाशी तसेच बोरिवलीला गोराई रस्त्यावर, कांदिवलीला ठाकूर व्हिलेजमध्ये मुलुंड पश्चिमेला फेमस फ्रँकी नावाचे स्टॉल्स आहेत. खालसा कॉलेजपाशी असलेल्या ‘आय लव फूड’ या ठिकाणची फ्रँकी मस्त. कॉलेजजवळ असल्याने कायम विद्यार्थ्यांची गर्दी ठरलेली. ताडदेवच्या भाटिया हॉस्पिटलसमोरील बॉम्बेरीलमध्ये फ्रँकीचे असंख्य प्रकार मिळतात. वांद्रय़ाच्या हिल रोडवरील हर्ष अॅण्ड कंपनीचे फ्रँकी प्रकार सेलिब्रेटींना तिथे खेचून नेतात. सायनची ए 1 आणि डी 1 फ्रँकी प्रसिद्ध आहेत. मुंबईला फ्रँकीची ओळख करून देणारे टिब्ब यांची दोन फ्रँकी शॉप ठाण्यात आहेत. एक मॉलमध्ये आणि एक नौपाडय़ात. पनवेल, खांदा कॉलनी, नेरुळ, कोपरखैरणे, बेलापूर या ठिकाणी तरुण मुले-मुली व नोकरदार मंडळी कागदात गुंडाळलेली फ्रँकी खाताना नेहमी दिसतात. अनेकांचा एक फ्रँकी हाच डबा असतो. चिकन टिक्का, मटण कबाब, आम्लेट, उकडलेले अंड आणि विविध सॉस, चटण्या व कांदा, टोमॅटोचे काप किंवा बारीक चिरलेला कांदा हे सारे रोटी वा चपातीत घालून तव्यावर ती चांगली भाजायची. शाकाहारी असेल तर पनीर, आलू टिक्की, चीज, टोफू यांचा भरणा. पण आता सर्वत्र मिळू लागलेला शावरमा रोल खूपच खाल्ला जाऊ लागला आहे. चांगले मॅरिनेट केलेल्या मांसाला सळीला लावतात. ती फिरत असताना तिला उष्णता मिळते. त्यामुळे मांसाचे तुकडे लवकर पडतात. काही जण कबाब वा टिक्काप्रमाणे चटणी व रोटीबरोबर ते खातात, पण त्यापेक्षा ते चटणी, सॉस लावलेल्या आणि कच्च्या भाज्यांचे तुकडे टाकलेल्या रोटी, चपातीमध्ये ठेवून खाणे सोयीचे. लोक रस्त्याने चालताना, वाहन चालवताना कपडे खराब होणार नाहीत या पद्धतीने शावरमा रोल खात असतात. पण तो खाताना अधिक काळजी घ्यायला हवी. ते मांस ताजे व स्वच्छ असेल, त्यावर किंवा आसपास माशा घोंगावत नसतील तर हा रोल खाण्याचा विचार करावा. हा लागतो उत्तम, पण वरील काळजीही आवश्यक. अमेरिकेत आणि अनेक देशांत बरिटो हा मेक्सिकन प्रकार खूपच लोकप्रिय झाला आहे. अमेरिकेतील जेरुसलेम बेकरीमध्येही तो खायला मिळाला. अटलांटा शहरात किमान 100 ठिकाणी बरिटो व टाको हे खास मेक्सिकन रोलचे प्रकार मिळतात आणि लोक नियमित खातात. हे दोन्ही प्रकार शाकाहारी व मांसाहारी यांच्या आवडीनुसार आता आपल्याकडेही मिळू लागलेत. एकदा बरिटोची रोटी चक्क हिरवी होती. कणिक भिजवताना पालेभाजी मिसळली असणार. मुंबईत न्यूयॉर्क बरिटो कंपनी नावाची किमान 15 रेस्टॉरंट्स वा शॉप्स आहेत. याखेरीज बरिटो, टाको, नाचो, सालसा आणि काळय़ा चवळीसह भात मिळणारी आणखी किमान 25 रेस्टॉरंट्स मुंबईत असावीत.
नव्या पिढीतील बहुसंख्य लोकांना ही रेस्टॉरंट्स व खाद्यपदार्थ यांची निश्चित माहिती असते. बरिटो जर शाकाहारी रोल असेल तर त्यात विविध सॉस, भाज्या, टोफू हे सारे खच्चून भरलेले असते, तर मांसाहारींसाठी चिकन वा मटण. इतर देशांत अन्य मांसही असते. ते गरम खाण्यातच मजा. टाको हा प्रकार आपल्याकडील पापडसारखा. अर्धगोल व कडक. त्यामध्ये अनेक भाज्या, तिखट व मीठ, चीज, ऑलिव ऑइल आणि ऑलिव फळ असे सारे असते. ओव्हनमध्ये ते सारे सात-आठ मिनिटे गरम करायचे, वरून नाचो घालायचे आणि ते सारे टाकोमध्ये भरायचे. अर्धगोल कडक पापडात भाजी घातली तर जसे लागेल, तसेच टाकोचे. अर्थात मांसाहारी लोकांसाठी मांस अधिक व भाज्या कमी. थोडक्यात काय तर रोलनंतर फ्रँकीची सवय होऊ लागली आहे आणि पाठोपाठ पिटा रोल, बरिटो, टाको हे लेबनीज व मेक्सिकन प्रकार इथे येऊन ठेपले आहेत. कुलाब्याचा बडे मिया पूर्वी साध्या रोटी वा खिमा रोटीवर आम्लेट घालून द्यायचा. म्हणजे पूर्वी होते तसेच पदार्थ आता नव्या प्रकारे खाण्यासाठी समोर आले आहेत. हा विविध रोल प्रवास थोडासा सँडविचपूर्वीचा आणि बराचसा सँडविचनंतरचाही आहे.


























































