
>> दिलीप ठाकूर
आजच्या मल्टिप्लेक्स युगातील चित्रपट दिग्दर्शकांना एकाच वेळेस चांगली थीम, अधिकाधिक विदेशी बाह्य चित्रीकरण स्थळांवर चित्रीकरण, पॉलिश्ड लूक आणि स्पेशल इफेक्ट्स त्यातही व्हीएफएक्स तंत्राचा वापर यांचा प्रभावी वापर करून पडद्यावर चित्रपट सादर करणे जणू आवश्यक ठरले आणि त्यात पटकथा लेखक व दिग्दर्शक संजय गढवी यशस्वी ठरला. 19 नोव्हेंबरच्या सकाळी नेहमीप्रमाणेच तो अंधेरीतील लोखंडवाला संकुलात मार्ंनग वॉकला गेला असता अचानक त्याला काही त्रास जाणवू लागला आणि त्याला कोकिळाबेन अंबानी इस्पितळात दाखल करण्यात येत असतानाच त्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दिग्दर्शक म्हणून यशस्वी कारकीर्दीने चांगले बस्तान बसले असताना त्याचे निधन व्हावे हे दुर्दैवाचे. संजय गढवीचा जन्म 22 नोव्हेंबर 1965 रोजीचा गुजरातमधील जुनागढ येथील. म्हणजेच वाढदिवसाला अवघे मोजून तीन दिवस असतानाच त्याचे निधन झाले. गुजराती कला आणि साहित्य क्षेत्रातील नावाजलेले मनुभाई गढवी यांचा हा मुलगा. लहानपणी त्याने आईसोबत पाहिलेला पहिला चित्रपट दिलीप कुमारची दुहेरी भूमिका असलेला ‘राम और श्याम’. मग मुंबईत त्याची जडणघडण झाली. आणि पस्तिसाव्या वर्षी ‘तेरे लिए’ ( 2000) या चित्रपटापासून त्याचे चित्रपट दिग्दर्शनात पाऊल पडले. यशराज फिल्म बॅनरखाली अनेक गुणी दिग्दर्शकांना संधी मिळाली त्यात संजय गढवीने यशराज फिल्मसाठी ‘मेरे यार की शादी है’ ( 2002) दिग्दर्शित केला. या चित्रपटाच्या सादरीकरणात निर्माता आदित्य चोप्राचा संजय गढवीवर विश्वास बसला आणि संजय गढवीला यशराजच्या बिग बजेट ‘धूम’च्या ( 2004) दिग्दर्शनाची संधी त्याला मिळाली. त्यामुळेच नवीन पिढीतील चित्रपट रसिकांची आवड निवड जाणणारा दिग्दर्शक अशी ओळख मिळाली. चित्रपटात अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, उदय चोप्रा, इशा देओल, रिमी सेन यांच्या प्रमुख भूमिका. इशा देओलला अतिशय मॉडर्न लूकमध्ये मोहक दाखवण्यासंदर्भात संजय गढवीने हेमा मालिनीची भेट घेऊन परवानगी घेतली. चित्रपटात मोठय़ाच प्रमाणावर स्पोर्टस् कारचा वापर करायचा होता. संजय गढवीने त्याऐवजी विविध मॉडेलच्या मोटरसायकलला दिलेल्या पसंतीने चित्रपटात वेगळाच थरार निर्माण झाला आणि चित्रपटाच्या यशाने देशभरात मोटरसायकलची जबर व्रेझ निर्माण झाली. चित्रपटाच्या जगात ‘यश हेच चलनी नाणे’ असल्याने ‘धूम’च्या खणखणीत यशानंतर संजय गढवीकडेच ‘धूम 2’चे दिग्दर्शन आले. एक पॉलिश्ड अॅक्शन चित्रपट. अभिषेक बच्चन, हृतिक रोशन, ऐश्वर्या राय, बिपाशा बासू असे मोठे स्टार आणि मारधाड, मादकता, मॉडर्न नृत्य व कॉम्प्युटरचा भरपूर वापर. संजय गढवीचे एक सूत्र होते, मनमोहन देसाई यांच्या मसालेदार मनोरंजक चित्रपटांप्रमाणेच आपण रसिकांचे मनोरंजन करावे. फरक इतकाच की, ते स्टाईलाईज असावेत. गतिमान असावेत. ती आजची गरज आहे. ‘धूम 2’च्या यशाने ‘स्टारडस्ट’च्या वतीने त्याला ‘हॉटेस्ट यंग फिल्ममेकर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. डिजिटल युगातील दिग्दर्शक म्हणून तो ओळखला जाऊ लागला. ‘धूम 3’च्या दिग्दर्शनाची संधी त्याला मिळाली नाही. ‘किडनॅप’ (2008), ‘अजब गजब लव्ह’(2012) या चित्रपटानंतर त्याने ‘ऑपरेशन परिंदे’ (2020) हा एक तासाचा चित्रपट दिग्दर्शित केला. यात भरपूर आधुनिक शस्त्रांनी अॅक्शन होती. आताही तो एका गुजराती चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी तयारी करीत होता. शाहरुख खानच्या रेड चिली बॅनरचा पुढचा चित्रपट तो दिग्दर्शित करणार होता. अशातच त्याचे दुर्दैवी निधन झाले. ‘धूम’ सिक्वेलसाठी तो कायमच ओळखला जाईल.



























































