
अंधेरी पूर्व-पश्चिमला जोडणाऱया गोखले पुलावर पश्चिम रेल्वेकडून 1300 टन वजनाचा पहिला महाकाय गर्डर बसवण्याचे काम आज पहाटे पूर्ण झाले. पुढील 15 दिवसांत पुलाची तांत्रिकदृष्टय़ा आव्हानात्मक कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेला उड्डाणपुलाची एक मार्गिका फेब्रुवारीच्या मध्यापासून सुरू करता येणार आहे. त्यामुळे अंधेरीतील रहिवासी, प्रवासी आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शनिवारी मध्यरात्री रेल्वे वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेऊन गर्डर बसवण्याचे काम सुरू करण्यात आले होते.
अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा हा गोखले पूल 1975 मध्ये बांधण्यात आला आहे. या पुलाचा काही भाग 3 जुलै 2018 मध्ये कोसळून दोघांचा मृत्यू झाल्यामुळे या पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. नोव्हेंबर 2022 पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मात्र हा पूल अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा असल्याने परिसरात वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अंधेरीसह सांताक्रुझ ते जोगेश्वरी या भागात प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. हा पूल वेगाने पूर्ण करण्यासाठी आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या पाठपुराव्यासह उपायुक्त उल्हास महाले, महापालिकेचा पूल विभागदेखील प्रयत्नशील आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱया राईट्स पंपनीच्या माध्यमातून गर्डर बसवण्याचे जोखमीचे काम केले जात आहे. पुलाच्या एकूण कामातील 80 टक्क्याहून काम याआधीच पूर्ण झाले आहे. दरम्यान, गर्डर बसवताना आमदार ऋतुजा लटके, पालिकेचे उपायुक्त उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल) विवेक कल्याणकर तसेच पश्चिम रेल्वेचे अधिकारी, मे. राईट्स लि. आणि पंत्राटदार ए. बी. इन्फ्राबिल्ट यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
असा आहे गोखले पूल
पुलाची लांबी – रेल्वे भूभागात- 90 मीटर
रेल्वेबाहेर – पूर्वेस 210 मीटर, पश्चिमेस- 185 मीटर
पुलाची रुंदी – (रेल्वे भूभागात)- 13.5 मीटर
रेल्वेच्या पूर्वेस व पश्चिमेस पोहोच रस्ते, पदपथासह – 12 मीटर (दोन्ही बाजूस)
एकूण रुंदी – 24 मीटर




























































