
>>दिव्या नेरुरकर-सौदागर
नैराश्य आणि ताण या दोन्हीही वेगळ्या अवस्था आहेत. ताण हा काही काळापुरता आणि आटोक्यात आणता येऊ शकतो. कारण ताण निर्माण करणारी कारणं संपली की, ताण हळूहळू निघूनही जातो. मात्र नैराश्य हे नकारात्मक कारणाशिवायही येऊ शकते. कारण त्यामध्ये शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक घटकांचा समावेश असतो आणि या व्यक्तींच्या आयुष्यात समजा एक जरी नकारात्मक घटना घडली तर ती घटना त्यांचे नैराश्य वाढायला किंवा ते इतर लोकांना समजायला कारणीभूत ठरू शकते.
सुहास (नाव बदलले आहे) हा चांगल्या कंपनीत मॅनेजर होता. अत्यंत मेहनती आणि होतकरू वृत्ती या दोहोंच्या जोरावर त्याने नोकरीच्या दोन वर्षांतच प्रमोशन मिळवले होते. सुहास हा वर्कोहोलिक होता. त्यामुळे तो सकाळपासून रात्री झोपेपर्यंत सतत त्याच्या कामाचाच विचार करत राहायचा. सकाळी ऑफिसच्या वेळेआधी त्याचे लॉगइन असायचे आणि ऑफिस सुटल्यावर तो बऱयाच वेळा ओव्हरटाईमही करायचा.
“मला कधी दिवस सुरू होतोय आणि मी माझ्या कामाला सुरुवात करतोय असं व्हायचं, पण तो एक दिवस आला आणि सगळंच बदलत गेलं” समुपदेशनाला आलेला सुहास आता हळूहळू व्यक्त होत होता. “तो दिवस माझा हेक्टिक होता. नुकतंच माझं माझ्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झालेलं होतं. बट वी आर स्टील मेन्टेनिंग अ गुड बॉन्ड” या वाक्यावर जोर देत त्याने पुन्हा सांगायला सुरुवात केली.
“त्या दिवशी मी घरी आलो, सोफ्यावर बसलो. मला त्या दिवशी सकाळपासूनच ऑफ वाटत होतं. का? माहीत नाही. त्याच वेळी आमच्या शेजारी राहणारी एक दोन वर्षांची मुलगी माझ्या पुतण्याबरोबर खेळत होती. तोही तिच्याएवढाच आहे. माझी वहिनी त्या दोघांबरोबर खेळत होती. त्यांची खेळणी होती तिथे. त्यातलं एक खेळणं हे बॅटरीवर चालणारं होतं. त्याचा तो आवाज मला त्या दिवशी इतका इरिटेटिंग झाला की, विचारू नका! अक्षरश मी वैतागून माझ्या रूममध्ये गेलो. बराच वेळ डोकं गच्च धरून होतो. माझं इरिटेशन वाढायला लागलं. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर मी चिडायचो. इतकं की, नंतर मला चालताना माझ्या चपलेचा आवाजही सहन होत नसे. हे काहीतरी वेगळंच घडत होतं माझ्या बाबतीत. नंतर नंतर बारीकसारीक आवाज टाळण्यासाठी मी माझ्या खोलीत स्वतला बंद करून घेऊ लागलो. ब्लॅकआऊट असायची माझी रूम. आवाजाप्रमाणेच प्रकाशही मला हळूहळू सहन होईनासा झालेला होता. खाण्याची इच्छा तर मेलीच होती. ऑफिसमध्येही कामाचा उत्साह गेला.”
सुहास त्याच्या ज्या अवस्थेचे वर्णन करत होता त्या अवस्थेला ‘क्लिनिकल डिप्रेशन’ असे म्हटले जाते. ही अवस्था म्हणजे ताणाची शेवटची पायरी म्हणता येईल. साधारण सहा महिन्यांपासून जर ही लक्षणे कायम असतील अथवा वाढत जात असतील तर त्याला ‘क्लिनिकल डिप्रेशन’ असे म्हटले जाते. सुहास याच अवस्थेतून जात होता. ज्यामध्ये वरील उल्लेख केलेल्या लक्षणांबरोबरच अनेक लक्षणे त्याच्यात आढळून येत होती. जसे की;
न् सतत रडावेसे वाटणे / रडत राहणे
न् कसलीही इच्छा नसणे
न् स्वतला सतत दोष देत राहणे
न् कुठलंही क्षुल्लक कामसुद्धा अतिशय तणावपूर्ण वाटणे
न् झोपेचे पा बदलणे / झोप न लागणे
न् स्वतवरचा विश्वास पराकोटीचा गमावून बसणे
न् कायम अपराधीपणाची भावना असणे
न् आयुष्य संपवावेसे वाटणे /प्रयत्न करणे
या अवस्थेचे वर्णन जितके वाचण्यास गंभीर आहे, त्यापेक्षा जास्त गंभीर अवस्था सुहास आणि अशा अवस्थेतील व्यक्ती दिवसेंदिवस भोगत असतात. त्यांच्या बिघडलेल्या मानसिक स्थितीची कल्पना आपण करू शकत नाही. दिवसातून बऱयाच वेळेस त्यांना नैराश्याच्या लक्षणांचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे या व्यक्ती कित्येकदा घरात स्वतला कोंडून तरी घेतात किंवा घरातील सदस्यांबरोबर एकत्र न राहता एकट्याच एका जागी बसून असतात. कोणाचीही भेट हे त्यांच्यासाठी जणू आव्हान असते. ‘मी निर्जीव, नालायक, असहाय्य’ अशा उदासीनतेमुळे त्यांच्यातील ऊर्जाशक्ती निघून गेलेली असते.
या व्यक्तींना त्यांच्या घरच्यांकडून आणि नातेवाईकांकडून असे सल्ले दिले जातात, जी मिथकं असू शकतात.
उदाहरणार्थ;
न् नैराश्य म्हणजे आळसाचं एक नाटक आहे.
न् अरे, मोटिव्हेशनल व्हिडीओ बघ! तुझं डिप्रेशन पळून जाईल.
न् हे सगळे मनाचे खेळ आहेत.
न् डिप्रेशन सगळ्यांनाच येतं, पण त्यावर आपणच जिद्दीने मात करायची असते.
न् डिप्रेशन हे फक्त मनाने दुबळ्या असलेल्या व्यक्तींनाच येतं.
न् बायकांनाच नैराश्य येतं.
न् नैराश्य म्हणजे वेडाचा झटका.
असे हेटाळणीवजा शेरे अशा व्यक्तींचे अजूनच मानसिक खच्चीकरण करून त्यांची अवस्था अधिकच बिघडवू शकतात.
नैराश्यात असणाऱया व्यक्तीला मूळातच शारीरिक आणि मानसिक ताकदीची गरज असते, जी सुरूवातीला मानसोपचार औषधे तसेच समुपदेशन याद्वारेच मिळते (जर हे नैराश्य अधिक प्रमाणात वाढले असेल तर काही व्यक्तींना भासही होतात. अशा वाढलेल्या नैराश्याकरिता काही वेळेस विद्युत आघात उपचार पद्धतीचाही म्हणजेच तिंम्trद-ण्दहन्ल्त्sग्न ऊपज्ब् अवलंब करावा लागतो).
नैराश्य आणि ताण या दोन्हीही वेगळ्या अवस्था आहेत. ताण हा काही काळापुरता आणि आटोक्यात आणता येऊ शकतो. कारण ताण निर्माण करणारी कारणं संपली की, ताण हळूहळू निघूनही जातो. मात्र नैराश्य हे नकारात्मक कारणाशिवायही येऊ शकते. कारण त्यामध्ये शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक घटकांचा समावेश असतो आणि या व्यक्तींच्या आयुष्यात समजा एक जरी नकारात्मक घटना घडली तर ती घटना त्यांचे नैराश्य वाढायला किंवा ते इतर लोकांना समजायला कारणीभूत ठरू शकते.
म्हणूनच नैराश्यामध्ये असलेल्या व्यक्तींना उपचारांबरोबरच गरज असते ती त्यांना सांभाळून घेण्याची. त्यांना सल्ल्यांपेक्षाही गरज असते ती त्यांना एकटं न पाडण्याची. कुटुंब आणि मित्रपरिवाराची साथ या गोष्टींमुळे अशा व्यक्ती नैराश्यातून बाहेर पडू शकतात, पण वेळ लागतो.
आज असे अनेक सुहास आहेत, जे स्वतच्या नैराश्याबद्दल मूकपणे सल्ले ऐकत आहेत आणि तरीही जिद्दीने लढत आहेत. त्यांना आपणच साथ दिली पाहिजे. नाही का?
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)
[email protected]































































