
>> अस्मिता येंडे
जीवनाला योग्य दिशा मिळण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. ‘स्व-यशाची गुरुकिल्ली’ हे पुस्तक एखाद्या गुरूप्रमाणे आपल्याला दिशा दाखवण्याचे कार्य करते आहे.
या पुस्तकात लेखक संदेश लाळगे, सहलेखिका स्वाती राणे-भगत आणि मृणाली पिळणकर या त्रिकुटाने मिळून यशाच्या विविध गुरुकिल्ल्यांविषयी अगदी सोप्या आणि नेमक्या शब्दांत मांडणी केली आहे. या पुस्तकाचे डॉ. लिडवीन डायस (प्राचार्य – कॉलेज ऑफ सोशल वर्क, मुंबई) आणि संदेश लाळगे यांनी सुयोग्य पद्धतीने संपादन केले आहे. या लेखसंग्रहात एकूण 30 गुरुकिल्ल्यांचा समावेश करून त्याद्वारे नेमकेपणाने चर्चा केली आहे.
या लेखसंग्रहातील अत्यंत महत्त्वाची व लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे यात ‘स्व’ला केंद्रस्थानी ठेवून माणसाला स्वत:च्या अंतर्मनात डोकावण्याची संधी देणारे आणि प्रोत्साहन देणारे लेख. ज्यांनी आपल्या जगण्यातील आत्मविश्वास गमावला आहे, ज्यांचं जीवन दिशाहीन झाले आहे, काय करावे हे उमगत नाही, अशा निराशेने ग्रासलेल्या सर्वांसाठी हा लेखसंग्रह ‘संजीवनी’ आहे. बहुतेकदा असे होते की, लोक काय म्हणतील, यांवर निर्णय घेतले जातात. स्वतला काय वाटते, याचा विचार करतो का आपण? लेखक संदेश लाळगे यांनी ‘स्व-ओळख’ या लेखात स्वतच्या मनाशी संवाद साधून आपल्या आवडीनिवडी, आपली मते यावर विचार करण्यास सांगितले आहे. आपण स्वतला किती ओळखतो, याची जाणीव या लेखाद्वारे होईल. यश प्राप्त करण्यासाठी ज्या गोष्टीवर भर द्यायला हवा, त्या प्रत्येक घटकावर यात चर्चा करण्यात आली आहे. आपल्यातील क्षमता, कौशल्य ओळखून तसेच आपल्यातील कलागुणांसोबत ज्या नकारात्मक गोष्टी आहेत, त्यावर काम करणं गरजेचे आहे. विचार ही अशी शक्ती आहे, ज्याने आपण ठाम निर्धार करून इच्छीत ध्येय प्राप्त करू शकतो. आपल्या मनाची शक्ती, ताकद किती अफाट आहे याची जाणीव हे पुस्तक करून देते.





























































