
>> विलास पंढरी
जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर गुरू लागतोच. ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः’. परब्रह्म म्हणजेच गुरू अशी गुरूंची थोरवी या श्लोकात वर्णिली आहे. गुरुदेव दत्तांना तर सद्गुरू म्हटले जाते. दत्ताची प्रसिद्ध स्थाने प्रयाग, औदुंबर, गाणगापूर, माहूर, नृसिंहवाडी, कुरवपूर, कर्दळीवन या ठिकाणी आहेत. श्रीदत्तांच्या कार्यावर लिहिलेला ‘गुरुचरित्र’ हा प्रसिद्ध ग्रंथ भक्तिभावाने वाचला जातो. भगवान दत्तात्रय यांच्याशी संबंधित दत्त संप्रदायाचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे ‘श्री गुरुचरित्र’ हा होय. दत्त जयंतीपूर्वी सात दिवस दत्तभक्त ‘गुरुचरित्र’ ग्रंथाचे काटेकोर नियम पाळून वाचन करतात. त्याला पारायण असे म्हणतात.
‘दत्तात्रय’ हा शब्द ‘दत्त’ व ‘आत्रेय’ अशा दोन शब्दांनी बनला आहे. ‘दत्त’ या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा आणि ‘अत्रेय’ म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मात्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्री ऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे, असाच बोध होतो.
भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ असून तिघेही सुमारे बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयांची उपासना करत आहेत. श्री दत्तभक्त ‘अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त’ असा जयघोष करतात. अवधूत म्हणजे नेहमी आनंदात रमणारा होय. श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे. श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरू मानले होते. पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे, अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती. तसेच त्यांनी अग्नीला गुरू मानून आपला देह हा क्षणभंगूर आहे, अशी शिकवण अग्नीपासून घेतली होती. चराचरातील प्रत्येक वस्तूतील परमेश्वराचे अस्तित्व पाहण्यासाठी श्रीदत्तगुरूंनी चोवीस गुरू केले होते. श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत. श्रीकृष्णाच्या लीलांप्रमाणेच श्री दत्तात्रयांच्याही अगाध लीला आहेत. जातीधर्माच्या कट्टरतेच्या भावना हल्ली पुढे येत असतात. अशा काळात दत्त जयंती उत्सव धार्मिक सलोख्यासाठी उपयुक्त ठरेल. महाराष्ट्रात हिंदूंप्रमाणे मुस्लिम समाजही श्री दत्तप्रभूंची उपासना करताना दिसतो. जैन पंथीय श्री दत्तगुरूंची ‘नेमिनाथ’ म्हणून पूजा करतात. असे दत्तगुरू हे सर्वधर्मसमभावाचे एक आगळेवगळे प्रतीक आहे.




























































