राज्यावर जलसंकट; जुलैपर्यंत धरणांतील पाण्याचे नियोजन करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील मराठवाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रात पाण्याचे साठे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे राज्यावर जलसंकट असून जुलै 2024पर्यंत धरणांमधील उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे. प्राधान्यांने नागरिकांच्या पिण्यासाठी पाणी राखीव ठेवावे, त्यानंतर शेतीला पाणी द्यावे, अशा सूचना जलसंपदा विभागाला देण्यात आल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री पवार सोमवारी पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, यंदाच्या वर्षी पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी झाल्याने अनेक ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीमध्ये पाणीसाठय़ाबाबत आढावा घेतला जात आहे. त्यानुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात यावे, त्यानंतर शेतीला पाणी द्यावे, अशा सूचना जलसंपदा विभागाला दिल्या असून त्यानुसार नियोजन सुरू आहे. खरीपाच्या पिकांनुसार एप्रिल, मे, जून आणि जुलै या चार महिन्यांपर्यंत पाणीसाठा नियोजनात्मकरित्या कसा वापरता येईल, त्यासाठी मार्चमध्ये पुन्हा कालवा सल्लागार समितीच्या बैठका घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. असेही पवार यांनी सांगितले.

राज्यातील प्रश्नांबाबत दिल्लीला जाणार

राज्यातील दुष्काळी परिस्थिती, साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मिती बंदी, कांदा आयात-निर्यात धोरण, विदर्भ आणि मराठवाडा आर्थिक विकास महामंडळ, गौण खनीज आदी प्रश्नांबाबत लवकरच केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले

दुष्काळी तालुक्यांसाठी 2500 कोटींची केंद्राकडे मागणी

राज्यातील 14 जिल्हे आणि 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून केंद्राच्या दुष्काळी पथकांनीदेखील येऊन सर्व्हेक्षण केले आहे. त्यानुसार 40 तालुक्यांसाठी 2500 कोटींची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. केंद्र सरकारच्या निकषानुसार जे तालुके दुष्काळात येत नाहीत, मात्र प्रत्यक्षात महसुली मंडळांमध्ये ज्यांचा दुष्काळी भागात समावेश होतो, त्यांच्यासाठी महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री, जलसंधारण मंत्री, कृषी मंत्री यांची विशेष समिती स्थापन केली आह  असल्याचे पवार यांनी सांगितले.