
प्रिया भोसले
भारतीय स्त्रीला अभावाने मिळणारी सणसणीत उंची,मधाळ डोळे आणि खळीदार हास्य हे तिचे अॅसेट्स.वडील प्रसिद्ध बॅडमिंटनपटू असूनही तिला चंदेरी दुनिया खुणावत होती.रितसर शिक्षण पूर्ण करुन तिने माॅडेलिंग सुरु केलं.म्युझिक आल्बममध्ये ही काम केलं. ते करत असताना शाहरुखच्या जीवलग मैत्रीणीने फराह खानने आपल्या महत्त्वकांक्षी चित्रपट ओम शांती ओम साठी तिची निवड केली आणि पहिल्याच चित्रपटात शाहरुखची नायिका झाली… दिपीका पदुकोण !
शाहरुखसोबत पहिलाच रोमँटिक सीन चालू होता.गरज नव्हती पण काहीतरी बोलायचं म्हणून, ती शाहरुखला बोलून गेली. तुझा बाजीगर आला तेव्हा मी शाळेत असताना लपूनछपून सिनेमा पाहिला होता.ते ऐकून तिच्या वयाची जाणीव झालेल्या शाहरुखचं अपसेट होणं स्वाभाविकच होतं.हा खुद्द शाहरुखनेच एका मुलाखतीत सांगितलेला किस्सा आहे.असो..
ओम शांती ओममधून तिने पदार्पण केलं आणि त्यावर्षीचा फिल्मफेअरचा बेस्ट फिमेल डेब्यूचा अवाॅर्ड कोणत्याही स्टार किड्सप्रमाणे आईबापाची पुण्याई न लावता मिळवला. तिचा आत्मविश्वास जबरदस्तच आहे. पहिल्या चित्रपटातला हिरो शाहरुख खान असो किंवा आरक्षणमधे समोर साक्षात अमिताभ असो, ती कधीच बुजली नाही. जे करायचं ते उत्तमच ह्यावर विश्वास असल्यासारखी ती चित्रपटात दिसायची. सुरुवातीचे लफंगे, परींदे,कल आज कल,आरक्षण ह्या चित्रपटांना जरी अपेक्षित यश मिळालं नाही तरी तिच्या कामाचं कौतुक होत गेलं आणि उत्तमोत्तम चित्रपट ही मिळत गेले.
2014 साल मात्र तिने स्वत:च्या नावावर केलं.आयान मुखर्जीच्या ‘ये जवानी है दिवानी’मध्ये चष्मा लाऊन अभ्यासू मुलगी साकारताना आत्मविश्वास कुठेही, एक आणा कमी न दिसलेली; अयान मुखर्जीला जशी अभिप्रेत होती तशी त्याला दिपीकामध्ये विनासायास मिळाली. तिच्यातली उत्तम प्रेयसी बघायची असेल तर जवानी है दिवानी बघावा. पूर्ण पिक्चरभर चष्म्यातून भारावलेल्या नजरेने आर.के.कडे पाहणारी नैना समर्पित प्रेयसीच दिसेल. त्यावेळेस रणबीर कपूरसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. त्यामुळे रोमँटिक दृष्यातल्या उत्कटतेने कळस गाठलेला. मुझे तुमसे प्यार हो जाऐगा…फिरसे और तुम्हे मुझसे प्यार नही होगा….फिरसे हा सीन पाहीलाय? त्यातला तिचा थरथरणारा आवाज ऐकलाय,काय नाही त्या आवाजात…तिची तक्रार,त्याच्या आकंठ प्रेमात असण्याची शिक्षा भोगलेला तो आवाज.उफ्फ्..
शाहरुखसोबत चेन्नई एक्सप्रेस तिचा दुसरा सिनेमा.शाहरुखचा काॅमेडी सेन्स अफलातून.सिनेमाच्या सुरुवातीला त्याने राहूलची झूल उतरवून ठेवली होती.उत्तम संवाद घेऊन शाहरुख सुसाट सुटला होता. फुल फोकस शाहरुखवर असताना दिपीकाच्या मिनम्माने साऊथ इंडियन उच्चारांनी चेन्नई एक्सप्रेसच्या चवीत इडली डोशाचा खमंगपणा आणला.’कहा से करीदी अयसी बोकवास डिक्शनरी’ म्हणणारी,रात्री स्वप्नं बघून अंगात भूत आल्यासारखा चित्रविचित्र चेहरा करुन शाहरुखचा जीव घशापर्यंत आणणारी दिपीकाची मिनम्मा विसरणं कुणाला शक्य आहे?
इजा,बिजा नंतर तिजा ह्याच जोडीचा हॅप्पी न्यू इयर खरंतर अतिशय टुकार सिनेमा, त्यातही दांडग्या आत्मविश्वासाने चुकीचं इंग्रजी बोलणारी मोहिनी उर्फ मोईनी शाहरुख,बमन, अभिषेक सोबत भाव खाऊन गेली. कधी काॅमेडी तर कधी तिच्या पर्सनॅलिटीला शोभणारी पिकूसारखी भूमिका. छान टिकली बिकली लाऊन दिवसभर चरत, डोळ्यांनी अशक्य सुंदर बोलायचं,खळीदार हसायचं असं सगळं नजरेला सुखावणारं वाटत असताना तिने छपाकमधून अँसिड अटॅकसारख्या सामाजिक प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या सिनेमाची निर्मिती केली.
मधला असला काळ उगाच भन्सालीच्या पिक्चर्समध्ये दिसली.वेळ वाया घालवायची ती कामे, 2014 ला करीनाने नाही म्हटलं नसतं तर गोलियों की रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावतमध्ये ती नसतीच. हे तिन्ही चित्रपट भन्सालीचं भव्यदिव्य करण्याच्या अट्टाहासापलिकडे काही नव्हतं.शेक्सपियरच्या रोमियो ज्युलीयेटला गुजराती भाषेत आणून फक्त रणवीरच्या शरीरसौष्ठवावरच फोकस करायचं होतं तर कुठलीही कथा चालू शकली असती.पण सांगणार कोण? आले भन्सालीच्या मना…
दिपीका आकर्षक आहे,मादक आहे पण विलक्षण सुंदर म्हणता येईल अशी नसताना उगाच दोन भुवया जोडून तिला पद्मावतीच्या सौंदर्यात बसवायचा अयशस्वी प्रयत्न भन्सालीच्या बराच अंगाशी आला.तिने आबदार अभिनय जरी केला तरी मुदलात सिनेमा लोकांच्या पसंतीस पडला नाही.
दिपीकाचे चित्रपट गाजले आणि तसंच तिचं डिप्रेशन ही. खरंतर तिने तिच्या डिप्रेशनलाही सामाजिक जागृतीसाठी गाजवलं म्हणणं योग्य होईल. आपल्याकडे “taboo” असलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे मानसिक आजार. तरीही डिप्रेशनवाली बाब ना तिने लपवून ठेवली आणि ना त्याचा सहानुभुती मिळवण्यासाठी हत्यार म्हणून वापर केला. पण त्याला रोखण्यासाठी, मानसिक आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी लिव्ह,लाफ,लव्ह फाऊंडेशन ह्या एनजीओची स्थापना केली. तिच्या या कार्याची दखल जगाने घेतली.
2018 मध्ये, TIME च्या जगातील 100 सर्वात प्रभावशाली लोकांच्या यादीत निकोल किडमन, गॅल गॅडॉट, ग्रेटा गेर्वग आणि लेना वेथ यांच्यासोबत स्थान मिळवणारी दिपीका एकमेव भारतीय अभिनेत्री होती. टाइम मॅगझिनद्वारे दोनदा सन्मानित होणारी ती पहिली हिंदुस्थानी व्यक्ती आहे.स्वतःच्या आजाराच्या अनुभवानंतर त्यावर इतरांना योग्य मदत मिळावी म्हणून आपलं स्टारपण वापरणारे फार कमी कलाकार आहेत ,दिपीका त्यापैकी एक.
सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या दिपीकाला तिच्या संपूर्ण कारकिर्दीत 57 पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत ज्यात तीन फिल्मफेअर पुरस्कार , सात आयफा , पाच प्रोड्यूसर गिल्ड फिल्म पुरस्कार , दहा स्क्रीन पुरस्कार , तीन स्टारडस्ट पुरस्कार आणि सात झी सिने पुरस्कारांचा समावेश आहे. भविष्यात अजूनही मिळतील, कारण लग्न झालं म्हणजे अभिनेत्रीचं करीयर संपलं विचारांना तिलांजली देणाऱ्या काळातली ती आहे.जवान,पठाण मधून तिचा हाॅट लूक,तिची क्रेझ दिसली तशीच आगामी फायटर,कल्की,सिंघम चित्रपटात हि तशीच दिसणार.मार्गात कितीही अडचणी आल्या तरीही चालत रहायचं आणि हेवा वाटेल अशी कारकीर्द घडवायची हे आज कुणाकडून शिकण्यासारखं असेल तर ती दिपीका पदुकोण आहे. चिंता आणि नैराश्यव्याप जीवनातून आयुष्याला योग्य दिशा देत करिअर उत्तम घडवणाऱ्या प्रेरणादायी प्रवासाला तिच्या वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा.
लेखिका या चित्रपट समीक्षक आहेत






























































