अमिताभ होणार ‘अयोध्या’वासीय, राम मंदिराजवळच घेतली जमीन; आलिशान बंगला बांधण्याची तयारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महानायक अमिताभ बच्चन उत्तम अभिनयाबरोबरच उत्तम गुंतवणूकदार आहे. अयोध्येची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी आता मोठी गुंतवणूक केली आहे. ही बातमी बाजारात आल्यापासून सर्वांनाच धक्का बसला आहे. अमिताभ बच्चन आता अयोध्यावासिय होणार आहेत. त्यांनी अयोध्येत कोट्यावधी रुपयांची एक जमीन खरेदी केली आहे. लवकरच त्यावर आलिशान बंगलाही बांधणार आहेत.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत घर बांधण्यासाठी 14.5 कोटी रुपयांची जमीन खरेदी केली आहे. मीडिया वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांनी मुंबईस्थित डेव्हलपर द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांच्या 7-स्टार एन्क्लेव्ह द सरयूमध्ये एक जमीन खरेदी केली आहे. हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांनी अमिताभ बच्चन यांच्यातील व्यवहाराशी परिचित असलेल्या लोकांचा हवाला देत, मीडिया रिपोर्ट्सने माहिती दिली आहे की, अमिताभ 10 हजार स्क्वेअर फुटांचे घर बांधणार आहेत आणि त्याची किंमत 14.5 कोटी रुपये आहे. 22 जानेवारी रोजी प्रकल्प सरयूचे उद्घाटन होणार आहे, त्याच दिवशी राम मंदिर ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. सरयू प्रकल्प 51 एकरात पसरलेला आहे. अमिताभ बच्चन यांचा जन्म अलाहाबाद येथे झाला.

या प्रकल्पातील आपल्या गुंतवणुकीबद्दल बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले की, अयोध्या शहराविषयी त्यांच्या हृदयात विशेष स्थान आहे. तर दुसरीकडे, एचओएबीएलचे अध्यक्ष अभिनंदन लोढा म्हणाले की, ते सरयू प्रकल्पाचे प्रथम नागरिक म्हणून ते अमिताभ बच्चन यांचे स्वागत करतात. हा प्रकल्प राम मंदिरापासून जवळपास 15 मिनिटांच्या अंतरावर आहे तर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. हा प्रकल्प मार्च 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे. 2019 पासून अयोध्येत इन्फ्रास्ट्रक्चर वाढले आहे. ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशीद जागेचे मालकी हक्क हिंदूंना दिले. तेव्हापासून तिथल्या जागेंचे भाव वाढले आहेत.