
>> स्पायडरमॅन
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाची जादू सध्या सगळय़ा जगावर राज्य करते आहे. मोठमोठय़ा कंपन्या स्वतःच्या मालकीचे AI तंत्रज्ञान विकसित करून सामान्य लोकांच्या वापरासाठी उपलब्ध करून देत आहेत. अनेक कंपन्यांनी हे तंत्रज्ञान मोफत वापरासाठी उपलब्ध करून दिल्याने जगभरात या तंत्रज्ञानाचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढलेला आहे. आता या तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रोग्राम्स आणि वस्तूदेखील तयार होऊ लागल्या आहेत. स्मार्ट टीव्ही, स्मार्ट फ्रीज, स्मार्ट फोन अशा विविध वस्तूंनी आपण घेरलो गेलेलो असताना आता चक्क AI वर आधारित आरशाची निर्मिती करण्यात आली आहे. या आरशाला ‘अनुरा मॅजिक मिरर’ असे नाव देण्यात आलेले आहे. पहिल्या दिवसापासून हा आरसा प्रचंड चर्चेत आलेला आहे. कारण फक्त तुमच्या चेहऱयाचे स्कॅनिंग करून हा आरसा तुमच्या प्रकृतीची, आरोग्याची माहिती तुम्हाला पुरवतो. इतकेच काय तर तुमचा मृत्यू जवळ आला असेल तर तोदेखील हा आरसा कळवतो असा निर्मात्यांकडून दावा करण्यात आला आहे. 21.5 इंचांचा ‘अनुरा मॅजिक मिरर’ म्हणजे खरे तर एक हायब्रीड टॅबलेट आहे. जेव्हा तुम्ही यामध्ये डोकावता तेव्हा यातील AI तंत्रज्ञान तुमच्या चेहऱयाला स्कॅन करते आणि तुमच्या चेहऱयातील रक्ताभिसरणाच्या (ब्लड फ्लो) मदतीने हेल्थ आणि त्यासंबंधातील सर्व डाटांचा अभ्यास करून तुम्हाला तुमच्या आरोग्यासंदर्भात अनेक गोष्टींची जसे की, हाय ब्लडप्रेशर, मेंटल स्ट्रेस, तापाची लक्षणे, डिप्रेशन, पल्स रेट, मधुमेह अशा संदर्भात माहिती देते. जर तुमच्या प्रकृतीची तपासणी करताना तुमच्या मृत्यूची लक्षणे त्याला आढळली तर त्याचीदेखील माहिती तुम्हाला देण्यात येते. अर्थात हा आरसा भविष्यात घडू शकणाऱया आजारांसंदर्भात तुम्हाला सचेत करत असतो. हे आजार तुम्हाला होतीलच असे नाही, असा धीरदेखील तज्ञांनी यासोबत दिला आहे.



























































