अनुभूती – जगण्याचा नवा धडा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> धनंजय पळसुले

जर तुम्हाला खरंच काही शिकायचंय, काही बनायचंय तर आजूबाजूच्या प्रत्येक घटनेकडे नीट उघडय़ा डोळय़ांनी पहा. ‘असं का?’ म्हणून स्वतला प्रश्न विचारा नि स्वतच त्या प्रश्नांची उत्तरे शोधा. आयुष्याच्या वाटेवर नवीन काहीतरी अनुभवायला मिळेल.

ज्योतिष शास्त्राशी जोडले जाण्याआधी मी सेल्स व मार्केटिंगच्या क्षेत्रात नोकरीला होतो. सेल्स व मार्केटिंग हे दोन्ही वेगळे विषय असले तरी या दोघांमध्ये नक्की काही साम्य आहे. एक गंमत सांगतो… त्या वेळी माझ्याकडे नोकरी नव्हती आणि वेगवेगळय़ा कंपनीत वॉक इन इंटरव्हय़ूला जायचो. जाहिराती पाहून वेगवेगळ्या ठिकाणी इंटरव्हय़ू द्यायचो. एकदा असंच जोगेश्वरी रेल्वे स्टेशनवर बसलो होतो. मी ट्रेनची वाट पाहत होतो. तेवढय़ात तिथे चार-पाच युवकांचं टोळकं आलं. त्यांच्या एकंदर चर्चेवरून लक्षात आलं की, ही नुकतीच शिक्षण संपवून बाहेर पडलेली मुलं आहेत नि सध्या नोकरीच्या शोधात आहेत. बोलत बोलत ती मुलं मी प्लॅटफॉर्मवर ज्या बाकडय़ावर बसलो होतो तिथेच बाजूला येऊन बसली होती. ती मुलं मालाडच्या कुठल्या तरी औषधांच्या कंपनीत असणाऱया व्हेकेन्सीबद्दल बोलत होती. आपापसात त्यांची अशी चर्चा सुरू असताना त्यांच्यापैकी एकाने दुसऱयाला त्या कंपनीचा फोन नंबर दिला. तो दुसऱयाला नंबर सांगत असताना मी गुपचूप तो नंबर लिहून घेतला. ट्रेन आली नि ती मुलं त्या ट्रेनने निघून गेली. मनात काहीतरी विचार सुरू होते. ज्या औषधांच्या कंपनीचा मी नंबर गुपचूपपणे लिहून घेतला होता तिथे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सायन्स बॅकग्राऊंड असणाऱया उमेदवारांनाच घेणार होते. तरी पण मी या कंपनीत इंटरव्हय़ू द्यायला जायचंच असं ठरवलं.

स्टेशनच्या बाहेर आलो नि एका पब्लिक फोनवरून त्या कंपनीत फोन केला. जास्त काही न विचारता फक्त “मुलाखतीला येऊ का?” असं विचारलं. माझा सायन्स बॅकग्राऊंड नाही हे कळलं तेव्हा त्यांनी इंटरव्हय़ूला येऊ नका सांगितलं, पण मी त्यांना विनंती केली. म्हटलं, एकदा भेट द्या नि मग काय ते ठरवा. शेवटी ते तयार झाले भेटायला अन् दोन इंटरव्हय़ू पार पडले. तिसरा इंटरव्हय़ू देताना पाच जणांनी मला वेगवेगळे प्रश्न विचारले नि मी माझ्यापरीने उत्तरे दिली. शेवटी त्यांच्यातील एकाने विचारले की, जर ही व्हेकेन्सी सायन्सच्या उमेदवारांसाठी आहे, तर मग तुम्ही तसे नसताना इंटरव्हय़ू देण्याची हिंमत कशी काय केली? मी त्यांना जोगेश्वरी स्टेशनवरचा घडलेला खराखुरा किस्सा सांगितला नि म्हटलं, मला नोकरीची गरज आहे नि गरजवंताला अक्कल नसते. प्रयत्न करणे माझ्या हातात होते नि नोकरी द्यायची की नाही हे तुमच्या हातात आहे. माझं असं बोलणं ऐकून त्यांनी आपापसात चर्चा केली व माझा सेल्समधला पूर्वानुभव पाहता माझी निवड केली.

सायन्सचा वा मेडिकल मेडिसीनचा कुठलेही बॅकग्राऊंड नसताना मी कंपनीचा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कामावर रुजू झालो. साऊथ मुंबई हा माझा कामाचा एरिया होता. या एरियामध्ये कामगार वर्ग, कष्टकरी वर्ग, वरळी बीडीडीसारखी मोठी वसाहत, प्रार्थना समाज व तत्सम उच्चभ्रू वर्ग होता तसाच कामाठीपुरासारखा शापित वर्गही होता. या कंपनीत मी एकच वर्ष काम केलं. पण भरपूर काही शिकायला मिळालं. कंपनीकडून मला डॉक्टरांना देण्यासाठी औषधांची सँपल्स मिळायची. यात पेन किलर असायचे, वेगवेगळी पचनाची औषधं असायची. गोळ्या, कॅप्सूल वा सिरप असायचे. विविध प्रकारची फूड सप्लिमेंटस् व टॉनिकही असायचे. ही सर्व औषधांचा साठा महिनाभरासाठी यायचा. रोज हे सँपल्स कंपनीने दिलेल्या बॅगेत भरून ठरलेल्या वेळापत्रकानुसार त्या त्या एरियात जाऊन त्या त्या ठरावीक डॉक्टरांना भेटून त्यांना कंपनीच्या औषधांबद्दल माहिती करून द्यायची असं कामाचं साधारण स्वरूप होतं.

इथे डॉक्टरांचीसुद्धा वर्गवारी असायची. म्हणजे उझ् म्हटलं म्हणजे general physician म्हणजे तो सहज उपलब्ध होणार. बहुधा सर्व उझ् ना आम्ही सकाळच्या सत्रात भेटत असू. तर तो वार लोअर परेलमधील ना. म. जोशी मार्गावरील काही डॉक्टरांना भेटण्याचा वार होता.

मी डॉक्टरांच्या दवाखान्यात पेशंट कधी संपताहेत नि कधी मला आत बोलावताहेत याची वाट पाहत होतो. सरतेशेवटी माझा नंबर आला. मी आतमध्ये गेलो. तो दवाखाना एका डॉक्टर पतीपत्नींचा होता. पैकी पत्नी फारच समर्पित वृत्तीने पेशंटचा विचार करणारी नि त्यांच्या सर्वच मूलभूत गरजांसाठी विविध उपाम राबवणारी अशी होतकरू महिला डॉक्टर होती. मी आत गेल्यावर कंपनीच्या औषधांबद्दल माहिती दिली. त्यांना सँपल्स म्हणून काही रक्तवाढीसाठीचे महिलांचे टॉनिक व इतर औषधे सँपल्स म्हणून दिली. तिथे समोरच दोन तीन बायका बसलेल्या होत्या, ज्या त्यांच्या पेहरावावरून कष्टाचे काम करणाऱया वाटत होत्या. मी कंपनीची चमकोगिरी करण्यासाठी व मुद्दाम फुशारकी मारण्यासाठी त्या डॉक्टरबाईंना म्हणालो, या ज्या बायका बसल्यात ना, त्यांना हे टॉनिक लिहून द्या. म्हणजे हे टॉनिक पिऊन त्यांना फायदा होईल आणि कंपनीचा सेलही वाढेल. त्यावर चमकून पाहून त्या डॉक्टर मॅडम मला म्हणाल्या, “ओ मिस्टर, काय म्हणताय तुम्ही कळतंय का तुम्हाला…? ही नुसती टॉनिक पिऊन कुणाला ताकद येते काय…?” तिथे बसलेल्या त्या बायकांकडे हात दाखवून म्हणाल्या, “या बायका दिवसाचे बारा बारा तास काम करतात, पण यांना दोन वेळचं साधं जेवणही मिळत नाही. कधी कधी तर उपासही घडतो नि तुम्ही अशा बायकांना नि अशा लोकांना टॉनिक लिहून द्या असं सांगताय?” मी आधी भांबावलो.

आपल्याकडून काहीतरी आगळीक घडलीय नि ते या डॉक्टरबाईंना आवडलं नाही हे लक्षात आलं. लगेच त्यांची माफी मागितली. त्यावर त्या म्हणाल्या, “तुम्ही कंपनीचा प्रसार नि प्रचार करताय ते ठीक आहे, पण एक लक्षात घ्या की, जो माणूस दोन वेळचं जेवण त्याच्या हलाखीमुळे मिळवू शकत नसेल, त्याला तब्येतीसाठी अशी टॉनिक काय कामाची! यांना किमान पोळीभाजी, वरणभात तर धड मिळू दे. नुसतं टॉनिक काय कामाचं! एखाद्याला जेवण म्हणून खारीक, काजू, बदाम नाही देऊ शकत. खारीक, बदाम, काजू हे ताकद वाढवायला, पण खरी ताकद तर रोजच्या जेवणानेच येते नि तेवढेही यांच्या नशिबात नसते.” मला माझी चूक कळली. त्या बायका कोण आहेत ते जाणून न घेताच मी काहीतरी बोलून गेलो. क्षणभर वाटलं की, डॉक्टर मॅडमनी एवढा इश्यू करायची गरज नव्हती. पण मग बोलता बोलता नंतर कळलं की, त्या तीन-चार बायकांपैकी एकजण नुकतीच पंधरा दिवसांपूर्वीच बाळंत झाली होती. परिस्थितीमुळे तिचं व तिच्या बाळाचं कसलंच कोडकौतुक नाही. लगेच रोजंदारीवर रुजू व्हावं लागलं. या प्रसंगानंतर मी कुठल्याही डॉक्टरांशी मर्यादितच बोलू लागलो आणि सर्वात मुख्य म्हणजे गरिबी कशी लाचार करते ते नव्याने पाहिलं. खरंच आहे, तुमच्याकडे जर सुदृढ शरीरसंपदा नसेल वा निरोगी शरीर व मन नसेल तर हिऱयामोत्यांचे नि सोन्याचांदीचे दागिने काय कामाचे!

[email protected]