ओव्हरटेक करणे जिवावर बेतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लालबाग उड्डाणपुलावर ओव्हरटेक करण्याच्या नादात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ऋषिकेश सालकर आणि शैलेश सैद अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

शनिवारी पहाटे काळाचौकी पोलिसांना बिनतारीवर संदेश प्राप्त झाला. लालबाग चौकीच्या समोर भायखळय़ाच्या दिशेने जाणाऱया रस्त्यावर अपघात झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर काळाचौकी पोलीस घटनास्थळी आले. एक जण पुलाच्या संरक्षक भिंती लावलेल्या रेलिंग पाईपला मानेतून पाईप घुसून अडकलेला होता, तर दुसरा हा गंभीर जखमी झालेला होता. त्याचदरम्यान एकजण तेथे आला. त्याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. ऋषिकेश आणि शैलेश हे दोघे अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी हे एका मोटारसायकलला ओव्हरटेक करून भरधाव वेगात हुल्लडबाजी करत भायखळय़ाच्या दिशेने जात होते. हुल्लड बाजी करत असताना नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल संरक्षक भिंतीला घासल्याने हा अपघात झाला. जखमी झालेल्या त्या दोघांना जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्या दोघांना तपासून मृत घोषित केले. याचा पुढील तपास काळाचौकी पोलीस करत आहेत.