
दिवंगत मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांच्या ‘चौथा अंक’ या आत्मचरित्राचे काल प्रकाशन झाले. आपल्या आयुष्यातील चढ-उतारांचा भावनापूर्ण प्रवास त्यांनी या आत्मचरित्रात मांडला आहे. रवींद्र महाजनी यांचे निधन होण्यापूर्वी काही दिवसआधी या चरित्राचे लेखन पूर्ण झाले होते. वेगळे राहात असलेल्या रवींद्र यांनी पुन्हा एकदा आपल्या कुटुंबासोबत येऊन राहावे असा आत्मचरित्राचा शेवट माधवी यांना करायचा होता, मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
माधवी यांचे जीवन खूप नाटय़पूर्ण राहिले आहे. त्यामुळे त्यांचे आप्तेष्ट, मित्रमंडळी, मुलगा गश्मीर हे नेहमी त्यांना याबाबत लिहिण्यास आग्रह करीत होते. अखेरीस माधवी यांनी आपल्या आयुष्याचा सर्व प्रवास ‘चौथा अंक’च्या रूपाने वाचकांसमोर आणला. या आत्मचरित्राचे शब्दांकन लेखिका माधुरी तळवलकर यांनी केले, तर प्रस्तावना माधवी आणि रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर याने लिहिली आहे. पुण्यातील भांडारकर संस्थेत पुस्तकाचे प्रकाशन अनौपचारिकपणे झाले.
आयुष्यात जे काही चांगले घडले ते सकारात्मक पद्धतीने मांडले, तर ज्या गोष्टींमुळे त्रास झाला त्या घटना अगदी परखडपणे मांडल्या. कोणत्याही गोष्टी एकांगी न ठेवता सरळ आणि स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न या आत्मचरित्रात केल्याचे माधवी यांनी सांगितले. यावेळी माधवी यांची मैत्रीण सुधा ओक, अभिनेत्री भाग्यश्री देसाई आणि लेखिका वर्षा काळे यांनी माधवी-रवींद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला, तर गश्मीरने भावस्पर्शी प्रस्तावना वाचून दाखवली तसेच बालपणीची एक भावनिक आठवणही सांगितली.
























































