
>> महेंद्र पाटील
कधी कधी आपण गर्दीत असूनही एकटे असतो. त्या एकटेपणात आपल्या मनात कुणीतरी असतं. तो असतो एक अनामिक चेहरा. कधी तो आपल्याला स्वप्नात दिसतो, तर तो केव्हा समोर येईल वा केव्हा त्याची आणि आपली भेट होईल हा विचार करत असताना अनेक ऋतू येत असतात आणि जात असतात.
असं आपल्याही आयुष्यात झालं आणि तो भेटीचा क्षण अखेरीस जवळ आला. आपण भेटलो आणि मनाला जाणीव झाली की, आपण ज्याची वाट पाहत होतो तोच चेहरा समोर आलाय. असा चेहरा जो खूप वर्षे आपल्याला मनात येऊन खुणावत होता. त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येक क्षणी करून देत होता. तो चेहरा कधी पावसाच्या चिंब सरीत कोसळताना दिसला, तर कधी तप्त उन्हात झाडाच्या थंड सावलीत भासला. कधी हिवाळ्याच्या गर्द धुक्याआड लपून वाट पाहात हसणारा, तर कधी आठवांच्या गावी नेऊन मनाला व्याकूळ करणारा, तर कधी आसवांच्या नद्या जन्माला घालणारा तो चेहरा…
खूपदा चुकामूकही होते. कधी कधी एकाच जन्मी, एकाच वाटेवर, एकाच आभाळाच्या खाली आपल्या सोबतच कुठेतरी असतो तो चेहरा. फक्त तो समोरासमोर कधी येत नाही. खूप वाट पाहायला लावतो आणि कधीतरी अवचित एखाद्या संध्याकाळी अलगदपणे समोर येऊन आपली ओळख करून देतो तो चेहरा. ओळख नवी असली तरी तो चेहरा नवा नसतो. कारण आपण त्याला मनातल्या मनात आजन्म पाहत आलेले असतो. फक्त वेळ आल्यावर तो समोर येतो आणि आपली ओळख देतो. ओळख होते, भेट होते, पण पुढे काय? हा प्रश्न मनाला पडतो. खरं तर यापुढचा प्रवास एकत्र करायचा असं ठरवलेलं असतं दोघांनी, पण प्रवास म्हटला की अडचणी आल्या, अडथळे आले. ऊन आलं, पाऊस आला. कधी धुक्यात वाटा धूसर झाल्या. सोबत चालताना जनरीतीचे कुंपण प्रत्येक पावलागणिक वाट अडवत होते. या सगळ्या अडचणी, सगळ्या शक्यता डोळ्यासमोर ठेवून आता आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. ऋतू येतील जातील, आपल्याला ठाम राहायचं आहे. कारण ओळखी होतात, भेटी होतात. नातीसुद्धा जोडली जातात, पण खऱया अर्थाने त्यानंतर प्रवास सुरू होतो. ती वाट सोपी नसते, तो प्रवास सोपा नसतो. कधी कधी आपल्या मनात दिसणारा तो चेहरा खूप उशिरा समोर येतो. संध्याकाळ होणार असते. ती कातरवेळ सोबत घालवावी असा आपल्या मनात विचार असतो, पण भेटल्यावरही आपण पुढच्या प्रवासाचा विचार जास्त करत राहतो. बऱयाचदा आपण जनरीतीचे कुंपण तोडून जायला तयार नसतो आणि बऱयाच लोकांचे प्रवास इथेच संपतात… बरीच नाती अधुरी राहतात. सगळी स्वप्नं पुन्हा मनाच्या खोल कप्प्यात जाऊन बसतात.
म्हणून जेव्हा आपल्याला हवा असलेला चेहरा समोर येतो, तेव्हा तो क्षण जगून घ्या, त्या क्षणाचा आनंद घ्या आणि तो प्रवास सुरू करा… बिनधास्त! तुम्हाला जिथे जायचंय त्या वळणावर तुम्ही नक्कीच पोहोचाल. कारण नियतीने याच गोष्टीसाठी तुम्हाला समोर आणलेलं असतं. बऱयाचदा आपण चौकटी मोडत नाही. चौकट मोडायला शिकलं पाहिजे.
आता माझ्या मनाला संध्याकाळची ओढ लागली आहे. ती संध्याकाळ संपून रात्र हळूहळू पाण्यात खोल उतरणार आहे आणि ती रात्र उगवत्या सूर्याची वाट पाहात नव्या स्वप्नांची नवी पहाट येणार आहे. आपल्या मनात आजन्म आपल्या सोबत असणाऱ्या दिसणाऱ्या चेहऱ्याशी आपली ओळख होणार आहे, पण एक गोष्ट सांगतो, तू भेटल्यावर असं वाटलं, तू आधीच भेटली असतीस तर बरं झालं असतं. मनातलं स्वप्न एव्हाना खरं झालं असतं.




























































