
मुंबई ते नवी मुंबई ही दोन महानगरे शिवडी-न्हावा शेवा या सागरी सेतूने जोडल्यानंतर आता मुंबई आणि ठाणे ही दोन महानगरे बोगद्याने जोडण्यात येणार आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून 12 किलोमीटरचे दोन बोगदे खणण्यात येणार असून त्यामुळे बोरिवली ते ठाणे हे 23 किलोमीटरचे अंतर अवघ्या 20 मिनिटांत पार करता येणार आहे. त्यासाठी नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्डलाईफने (राष्ट्रीय वन्यजीव मंडळ) एमएमआरडीएला मंजुरी दिली आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवली आणि ठाणे जिह्याला भूमिगत मार्गाने जोडणाऱया या प्रकल्पासाठी 10.25 किमीचा बोगदा आणि 1.55 किमीचा पोहचमार्ग असा 13.05 मीटर अंतर्गत व्यासासह सुमारे 12 किमी लांबीचा दुहेरी भूमिगत बोगदा असणार आहे. या बोगद्याच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी दोन मार्गिकांसह आपत्कालीन मार्गदेखील बनवण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहन चालकांचा दीड तास वाचणार असून कार्बन उत्सर्जन कमी होऊन प्रदूषणदेखील कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, एमएमआरडीएचे अध्यक्ष संजय मुखर्जी यांनी ’एक्स’वर राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने मंजुरी दिल्याचा आनंद व्यक्त करत हा प्रकल्प या दोन महानगरांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे, असे म्हटले आहे.
सुरक्षेसाठी उपाययोजना
प्रकल्पातील या बोगद्यांमध्ये अग्निशमन उपकरणे, स्मोक डिटेक्टर, एलईडी लाईटचे संकेत फलक लावले जाणार आहेत. बोगद्यात नैसर्गिक किंवा यांत्रिक मार्गाने पुरेशी वायुविजन प्रणालीदेखील उभारली जाणार आहे.
प्रकल्पाची एकूण किंमत अंदाजे 16 हजार 600 कोटी इतकी असून त्यामध्ये जमीन अधिग्रहणाच्या खर्चाचाही समावेश आहे. एकूण 46.57 हेक्टर जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे, त्यात 35.53 हेक्टर वन जमीन आहे, तर उर्वरित जमीन चितळसर, मानपाडा, माजिवडा, मागाठाणे, बोरीवडे, चेने आणि येऊर या गावातली आहे.
असा आहे प्रकल्प
प्रत्येक 300 मीटरवर पादचारी क्रॉस पॅसेज आणि प्रत्येक दोन पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद आहे.
प्रकल्पातील बोगद्यांचे बांधकाम हे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आणि चार टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने करण्यात येणार आहे.
सुमारे 12 किमी लांबीच्या प्रकल्पातील 4.43 किमी लांबीचा बोगदा हा ठाणे जिह्यातून तर 7.4 किमी लांबीचा बोगदा हा बोरिवलीमधून जाणार आहे.



























































