
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीनंतर भाजपवर हल्लाबोल केला आहे. संदेशखळी प्रकरणावर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. आमच्या संयमाला आमची हतबलता समजू नका असा इशाराच ममता बॅनर्जी यांनी यावेळी दिला आहे.
पश्चिम बंगालच्या संदेशखळीमध्ये महिलांसोबत झालेल्या अत्याचाराचे भाजप सातत्याने प्रदर्शन करत आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत संदेशखळी प्रकरणाचा उल्लेख केला आणि पीडित महिलांचीही भेट घेतली. यावर आता ममता बॅनर्जी यांनी प्रत्योत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, बंगाल ही देशाची सांस्कृतिक राजधानी आहे आणि काही लोकं त्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. ममता बॅनर्जी यांनी आमच्या संयमाला आमची हतबलता समजू नका असा इशाराच भाजपला दिला आहे. पंतप्रधान केवळ निवडणुकीच्या वेळी येतात आणि त्यानंतर गायब होतात असा जबरदस्त टोलाही ममता यांनी यावेळी लगावला.




























































