
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करून शासनाची दलालांमार्फत कोटय़वधी रुपयांची लूट सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सहायक कामगार आयुक्तांना आज धारेवर धरण्यात आले. याप्रकरणी माहिती त्वरित जाहीर करून शासनाची लूट थांबवावी; अन्यथा वरिष्ठ पातळीवर चौकशीसह निलंबनाची मागणी करण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी विशाल घोडके यांना निवेदन देण्यात आले.
बांधकाम कामगार व इतरांना सक्षम करण्यासाठी विविध करांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात अनेक सुविधा दिल्या जात आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून सत्ताधारी लोकप्रतिनिधी व त्यांच्या पदाधिकाऱयांकडून बोगस कामगारांची नोंद केली जात आहे. त्यात आपला व आपल्या कर्मचाऱयांचासुद्धा सहभाग असल्याशिवाय हे सर्व शक्य नाही. बोगस नोंदणीमुळे विनाकारण शासनाची कोटय़वधी रुपयांची लूट होत असून, काही राजकीय मंडळी आपला मतदारसंघ सक्षम करण्यासाठी व मतदान वाढवण्यासाठी संबंधित खात्याचा दुरुपयोग करीत आहेत.
जे ठेकेदार (सिव्हिल इंजिनीअर) शिक्के मारून आपले कामगार किती आहेत, याची आपल्याकडे यादी पाठवतात, त्यातील काही ठेकेदारच कामगारांची खरी यादी सही शिक्क्यानिशी पाठवतात. पण तेथे आपल्या कार्यालयातील काही दलाल व कर्मचारी बोगस सही शिक्के मारून लाभार्थी कामगारांची यादी मोठय़ा प्रमाणात वाढवतात, असे अनेक गंभीर आरोप या निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत.
यावेळी शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, हर्षल सुर्वे, राजू यादव, विनोद खोत, राजू सांगावकर, महिला संघटक स्मिता सावंत-मांडरे, प्रेरणा बाकळे, सुशील भांदिगिरे, दिनेश साळोखे आदी शिवसैनिक उपस्थित होते.



























































