चेन्नई सिंगम्सचा सलग दुसरा विजय; दिलीप बिंजवाची शेवटची ओव्हर ठरली निर्णायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेन्नई सिंगम्सने कमालीचे सातत्य राखत बंगळुरू स्ट्रायकर्सचा तीन धावांनी पराभव केला. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग टी-10 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सिंगम्स यांनी सलग दुसरा विजय नोंदवला.

ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर शुक्रवारी हा सामना पार पडला. यादरम्यान झालेल्या साउथ डर्बी सामन्यात डावखुरा वेगवान दिलीप बिंजवाने टाकलेल्या शेवटच्या षटकात अचूक मारा करताना प्रतिस्पर्ध्यांना विजयापासून रोखले. सलग दुसर्‍या विजयासह 4 गुणांनिशी चेन्नई सिंगम्सनी गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

शेवटची ओव्हर निर्णायक

अंतिम षटकात बंगळूरूला जिंकण्यासाठी 7 धावांची गरज होती. यावेळी कर्णधार सुमीत ढेकळेने डावखुरा वेगवान गोलंदाज दिलीप बिंजवाकडे (2 षटकात 3-4) चेंडू सोपवला. त्याने संघनायकाचा विश्वास सार्थ ठरवला. त्याने मन्सूर के. एल. याला (17 चेंडूत 22 धावा) दोन निर्धाव चेंडू टाकताना त्याच्यावरील दडपण वाढवले. मोठा फटका मारण्याच्या नादात मन्सूरला तिसर्‍या चेंडूवरही धाव मिळाली नाही. शेवटच्या तीन चेंडूंत सात धावांची गरज असताना बिंजवाने संजय कनोजियाला पर्व लांबाकरवी झेलबाद केले. अचूक मारा करणार्‍या बिंजवा याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे.

50-50 चॅलेंज-

50-50 चॅलेंज हे आयएसपीएलचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. फलंदाजी करणारा संघ स्वतःला किमान 16 धावांचे लक्ष्य सेट करतो आणि प्रतिस्पर्धी संघातून कुणी गोलंदाजी करायची हे निवडतो. फलंदाजी करणार्‍या संघाने लक्ष्य गाठल्यास किंवा ओलांडल्यास 50 टक्के अधिक धावा जोडल्या जातात. उदाहरणार्थ, एखाद्या संघाने 20 धावा केल्या तर त्यांना त्या षटकासाठी 30 धावा मिळतील. त्यांनी 10 धावा केल्या तर त्यांना फक्त पाच धावा मिळतील.