ईव्हीएम फोडणारा भाजपा आमदार गजाआड, ओदिशात मतदान केंद्रावरील मस्ती नडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतदान करायला विलंब होतो आहे या कारणामुळे चिडून थयथयाट करत ईव्हीएमची तोडफोड करणारे ओडिशा विधानसभेसाठीचे भाजप उमेदवार प्रशांत जगदेव यांना अटक करून तुरुंगात रवाना करण्यात आले आहे. ओडिशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होत असून, भाजप आणि बीजेडी यांच्यात चुरशीची लढत होत आहे.
विशेष म्हणजे हेच प्रशांत जगदेव यापूर्वी बीजेडीचे आमदार होते. भाजपने अर्थातच हे आरोप राजकीयदृष्टय़ा प्रेरीत असल्याचे आधी म्हटले होते.

पोलीस काय म्हणाले?

पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले की, पीठासीन अधिकाऱयाने त्यांच्या तक्रारीत, आमदाराने बूथवर गोंधळ घातला. मतदान प्रक्रियेत व्यत्यय आणून मतदान कर्मचाऱयांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. तक्रारीच्या आधारे आमदार जगदेव यांना अटक करण्यात आली आहे.

बीजेडीचे प्रवक्ते सस्मित पात्रा यांनी आरोप केला की, जगदेव यांनी बूथमधील मतदान कर्मचाऱयांवर हल्ला केला आणि नंतर भुवनेश्वरच्या खासदार अपराजिता सारंगी यांच्या कारमध्ये लपून घटनास्थळावरून पळ काढला. शनिवारी लोकसभेच्या 6 आणि विधानसभेच्या 42 जागांसाठी ओडिशात एकाच वेळी मतदान झाले.

नेमके काय झाले…

शनिवारी मतदानाच्या दिवशी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने चिल्का येथील भाजप आमदार जगदेव यांना मतदानासाठी बराच वेळ रांगेत उभे राहावे लागले. उशीर झाल्याने चिडलेल्या जगदेव यांनी पीठासीन अधिकाऱयांशी हुज्जत घालत असताना टेबलवरून ईव्हीएम जबरदस्तीने खेचल्यामुळे ते यंत्र खाली पडून तुटले. याबद्दल तक्रार नोंदवण्यात आल्यावर पोलिसांनी प्रशांत यांना अटक केली. आज तकच्या रिपोर्टनुसार, ही घटना शनिवार, 26 मे रोजी घडली. जगदेव यांना भाजपने या वेळी खुर्द विधानसभेसाठी उभे केले आहे.