
मुंबईसारख्या शहरात घरांच्या किमती अवाच्या सवा असूनही घरांची खरेदी कमी होत नाही. उलट ती दिवसेंदिवस वाढत आहे. श्रीमंत मुंबईकरांचा मुंबईसह जवळ असलेल्या शहरांत सेकंड होम घेण्यावर भर दिसत आहे. गेल्या दीड वर्षात अलिबाग, लोणावळा, कर्जत, नेरळ, मुरबाड, पाचगणी या ठिकाणी सेकंड होमसाठी ग्राहकांनी तब्बल 200 कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे, अशी माहिती आता समोर आली आहे. मुंबईपासून अलिबाग, लोणावळा, कर्जत ही शहरे जवळ आहेत. तसेच या ठिकाणी पायाभूत सुविधांची निर्मिती बऱयापैकी झालेली दिसत आहे. त्यामुळे मुंबईकर या ठिकाणी सेकंड होम घेण्यास प्राधान्य देत आहेत. मुंबईला जोडणारा अटल सेतू झाल्यामुळे अलिबाग आणि पुणे या शहरात जाण्यासाठी मुंबईकरांचा वेळ वाचत आहे. या ठिकाणी एका दिवसात किंवा विपेंडला जाण्यासाठी मुंबईकरांचा जास्त कल दिसून येत आहे. ज्या श्रीमंत लोकांनी सेकंड होम घेतले आहेत.
मोकळय़ा भूखंडांना मागणी
मोकळा भूखंड खरेदी करण्याला प्राधान्य दिले आहे. मोकळा भूखंड घेतल्यास त्या ठिकाणी मनासारखे घर किंवा बंगला बांधता येतो. त्यामुळे अनेकजण बंगला खरेदीऐवजी मोकळा भूखंड खरेदीला प्राधान्य देत आहेत.
अभिनेते आणि क्रिकेटर्स
सेकंड होम खरेदी करण्यात बॉलीवूडमधील अभिनेते, अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंचा समावेश आहे. यामध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान, अमिताभ बच्चन, रणवीर सिंग, दीपिका पादूकोण, सुहाना खान, अनुष्का शर्मा, क्रिकेटपटू रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह अनेकांनी सेकंड होम खरेदी केले आहे. याव्यतिरिक्त उद्योगपती, बिझनेसमॅन आणि श्रीमंत मुंबईकरांनी सेकंड होम खरेदी करण्याला प्राधान्य दिले आहे.