मणिपुरात हिंसाचार सुरूच; सीआरपीएफच्या ताफ्यावर गोळीबार, जवान शहीद

मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच असून जिरीबाम जिह्यातील मोंगबुंग गावात रविवारी संशयित अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) अजय कुमार झा हा जवान शहीद झाला. या हल्ल्यात जखमी झालेल्या अन्य दोन पोलीस कमांडोंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मणिपूर पोलीस आणि सीआरपीएफचे पथक संयुक्त गस्त घालत असताना संशयित बंडखोरांनी जिरीबाममध्ये हल्ला केला. बिहारचा रहिवासी असलेला अजय कुमार हा पथकाची एसयूव्ही गाडी चालवत होता. दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात त्याच्या डोक्याला गोळी लागल्यावर तातडीने रुग्णालयात आणण्यात आले, मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

कुकीमैतेई यांचे परस्परांवर आरोप

मैतेई बंडखोर जिरीबाममधील कुकीच्या गावांवर हल्ले करत आहेत, असा आरोप कुकीच्या संघटनांनी केला आहे. मैतेई गटांनी या आरोपांचा इन्कार केला आहे. हिंसक कारवाया बंद करण्याच्या करारावर स्वाक्षरी केलेले सुमारे डझनभर कुकी-झो बंडखोर गट नियमांचे उल्लंघन करून नागरिक आणि सुरक्षा दलांवर हल्ले करत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.

 मोदींना काहीच फरक पडत नाही!

एक वर्षाहून अधिक काळ उलटला तरीही मणिपूर आजही हिंसाचाराच्या आगीत होरपळते आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांना काहीच फरक पडत नाही. ते त्यांच्याच जगात मशगुल आहेत, अशी जोरदार टीका काँग्रेसने एक्सवर केलेल्या एका ट्विटमधून केली आहे.

मुख्यमंत्री बिरेन यांचे कुकी अतिरेक्यांकडे बोट

मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी एक्सवर या हल्ल्याचा निषेध केला आहे. आज जिरीबाम जिह्यात कुकी अतिरेकी असल्याचा संशय असलेल्या सशस्त्र गटाने केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफ जवानाच्या हत्येचा मी तीव्र निषेध करतो, असे म्हणताना त्यांनी कुकी अतिरेक्यांकडे बोट दाखवले आहे.

कुकी आणि मैतेई यांच्यातील चकमकी सुरूच

जिरीबाम जिह्यात अनेक भागात कुकी आणि मैतेई आदिवासी संघटनांच्या सशस्त्र गटांमध्ये चकमकी होत आहेत. 13 जुलैच्या रात्रीही मोंगबुंग गावात गोळीबाराचा आवाज ऐकू आला होता, असे एका अधिकाऱयाने सांगितले. शेजारील डोंगरी भागातून मोंगबुंग येथे अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे, असे आणखी एका अधिकाऱयाने सांगितले.