अमित शहांच्या दौऱ्यानंतर हरयाणात ईडीची छापेमारी, काँग्रेस आमदार सुरेंद्र पवार यांना अटक

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर हरयाणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने पुन्हा छापेमारी सुरू केली आहे. शुक्रवारी काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांच्या मालमत्तांवर छापे टाकण्यात आले. त्यापाठोपाठ आज काँग्रेस आमदार सुरेंद्र पवार यांना ईडीने अटक केली.

सुरेंद्र पवार हे सोनीपत मतदार संघाचे आमदार आहेत. यमुनानगर परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा खाणकाम केल्याचा आरोप ईडीने त्यांच्यावर केला आहे. अटकेनंतर आता पवार यांना अंबाला येथील विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे.

यापूर्वी हरयाणा पोलिसांनी सुरेंद्र पवार यांच्यासह इतरांविरोधात गुन्हे दाखल केले होते. त्याआधारे ईडीने अवैध खाणकामाचा तपास सुरू केला. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महेंद्रगडमध्ये मागासवर्ग संमेलनाला आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसला उद्देशून ‘एक एक पैशाचा हिशोब घेतला जाईल’ असा इशारा दिला होता. त्यांच्या इशाऱ्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या ईडीने काँग्रेस नेत्यांविरोधात छापेमारी सुरू केली.

गुरुग्राम येथे रेड मेसर्स एलाईड स्ट्रीट लिमिटेडच्या कथित 1392 कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणात छापे टाकण्यात आले. पाच शहरांमध्ये 15 ठिकाणी ईडीच्या पथकाने झाडाझडती घेतल्याचे समजते. यमुनानगर आणि हरियाणाच्या विविध भागांमध्ये आर्थिक अफरातफरीच्या आरोपांवरुन ईडीमार्फत कारवाई केली जात आहे, असे ‘दैनिक भास्कर’ने वृत्त दिले आहे.