संस्कृती – मि… त… वा…

<<< गुरुनाथ तेंडुलकर

मितवा म्हणजे मित्र… तत्त्वज्ञ… आणि वाटाड्या… ज्याला इंग्रजीत फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड म्हणतात. असा हा ‘मितवा’ आपल्या आजूबाजूलाच असतो, पण तो सापडायला मात्र फार मोठं नशीब लागतं. हा मितवा गुरू म्हणून ज्याला लाभतो त्याचं आयुष्य धन्य होतं. ज्याच्या आयुष्यात अशी व्यक्ती येते, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस ही गुरुपौर्णिमाच!

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हा लेख लिहिताना त्या विषयासंबंधी थोडं विवेचन करावं म्हणून आधी ‘गुरू’ या शब्दाचा मला कळलेला अर्थ सांगतो. गुरू म्हणजे जो आपल्याला योग्य मार्ग दाखवतो तो. ज्याच्याकडून आपण काहीतरी शिकतो तो गुरू. श्री दत्तात्रेयांनी त्यांच्या आयुष्यात चोवीस गुरू केले असं म्हणतात. त्यांचे गुरू कोण ते थोडक्यात पाहूया. पृथ्वी, वारा, आकाश, पाणी  आणि अग्नी ही पंचमहाभूतं. त्याचबरोबर चंद्र, सूर्य तसंच कबुतर, अजगर, मधमाशी, हत्ती, हरीण, मासा, साप यांसारखे पशुपक्षी, प्राणी तसेच एक लहान बालक, गृहिणी, धनुर्धर, मासे पकडणारा कोळी इत्यादी. ते म्हणतात,

जो जो जयाचा घेतला गुण ।

तो तो गुरू मी केला जाण ।

गुरूसी आले अपारपण ।

संपूर्ण जग गुरू दिसे ।।

या जगात आपण अनेकजणांकडून अनेक गोष्टी शिकत असतो. अगदी दररोजच्या व्यवहारातही आपल्याला अनेकजण भेटतात. अनेक अनुभव येतात. त्या अनुभवातून आपण बरंच काही शिकू शकतो. म्हणूनच ‘संपूर्ण जग गुरू दिसे’ हे दत्तात्रेयांचं वचन अगदी योग्य आहे.

तरीही प्रश्न उरतो की, नेमकं गुरू कोणाला म्हणावं? आपल्या आजूबाजूला नजर फिरवली तर आपल्याला आढळेल की, आपल्याच जवळचे अनेकजण कुणाच्या तरी आध्यात्मिक संताच्या-गुरूच्या भजनी लागलेले असतात. हे तथाकथित आध्यात्मिक गुरू नेमकं काय काय करतात हे जरा डोळसपणे पाहिलं की, जाणवेल, हे स्वतला संत म्हणवून घेणारे हे गुरू एअरकंडिशन आश्रमात राहतात, पांढरेशुभ्र किंवा भगवे कपडे घालून वावरतात आणि अध्यात्माच्या नावाखाली धंदा करतात. अध्यात्माची बेगडी झूल पांघरून ही बाबा-बुवा मंडळी भोळ्याभाबड्या जनतेच्या पैशांवर गब्बर होतात.

हे तथाकथित गुरू स्वतच्या चमत्काराच्या पोथ्या छापतात. भक्तांना त्या पोथ्यांची पारायणं करायला सांगतात. आपल्या फोटोंचे लॉकेट, बिल्ले, घडय़ाळं आणि पेन विकतात. पुढे एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या सहकाऱ्याने सरकारी जमिनी हडप करतात. तिथे पंचतारांकित आश्रमशाळा बांधतात. हे सगळं करताना अन्नदान, दीपदान, गोपालन वगैरे वेगवेगळ्या नावाखाली भोळ्याभाबड्या भक्त मंडळींकडून देणग्या गोळा करतात. त्या देणग्यांतून, पैशांतून थोडा दानधर्म, थोडीशी समाजसेवा करतात. धर्मजागृतीच्या नावाखाली प्रवचन आणि स्वतच्या दर्शनाचे सोहळे. कधी एखादं रक्तदान शिबीर, वृक्षारोपण वगैरे. कधी गणपती विसर्जनाच्या दिवशी पाणी वाटप, कुठल्या तरी झोपडपट्टीत जाऊन शाळकरी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करतात. पैसा भोळ्या भक्तांचा, पण नाव मात्र या भोंदू बाबांचंच होतं. बॅनर आणि फोटो या भामट्यांचेच झळकतात.

हे बाबा-बुवा-स्वामी एखादी संस्था रजिस्टर करून त्या संस्थेच्या नावावर वातानुकूलित गाड्यांचे ताफे पदरी बाळगतात. बायकामुलांसह परदेशवाऱ्या करतात. गल्लाभरू पत्रकारांना हाताशी धरून स्वतःच्या कार्याचा गौरव फोटोसकट पेपरातून छापून आणतात. या मंडळींकडे मोक्षाच्या आशेनं जाणाऱ्यांचा कपाळमोक्षच होण्याची शक्यता जास्त. अलीकडे आपल्या देशात, विशेषत महाराष्ट्रात सत्संग म्हणून जे काही प्रकार चालतात, तिथे नेमकं काय चालतं हे जरा डोळसपणे पाहिलं तर कुणीही थोडीशी अक्कल शिल्लक असणारा माणूस पुन्हा कधीही त्या वाटेला जाणार नाही.

कुणीतरी एक बाबा उंच मंचावर बसून काहीतरी प्रवचन देत असतो. स्वत जरतारी उपरणं पांघरणारा, एअरकंडिशन गाडीतून फिरणारा, श्रीमंत भक्तांकडून देणग्या गोळा करणारा, सेवेच्या नावाखाली गोरगरीब भक्तांना फुकट राबवून घेणारा आणि ऐषोआराम उपभोगणारा ‘स्वामी’ जमलेल्या लोकांना मात्र साधेपणावर प्रवचनं झाडत असतो. उपस्थितांपैकी जवळ जवळ नव्वद टक्के भक्तांना प्रवचनात रस नसतो. ते दर्शनाला आलेले असतात. कुणाला नोकरी हवी असते, कुणाच्या मुलीचं लग्न जमत नसतं, कुणाला घरी जाच होत असतो, कुणाला मूल होत नसतं, कुणाला शारीरिक व्याधी असते, कुणाला काय, तर कुणाला काय! दर्शनाला येणारी मंडळी आपापल्या प्रापंचिक समस्या घेऊन येतात. महाराजांच्या दर्शनाने, त्यांच्या आशीर्वादाने आपल्या समस्या दूर होतील अशी त्यांची श्रद्धा असते. अनेकांना अशा प्रकारचे ‘अनुभव’ आलेत असं त्यांनी त्या बाबाच्या पोथीत वाचलेलंही असतं. आपल्यालाच अद्याप प्रचीती आली नाही. कारण आपली श्रद्धा कुठेतरी तोकडी पडत असावी असा समज करून बिचारे भक्तगण अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणाने या ‘सद्गुरू’चं रूप डोळ्यांत साठवत असतात. त्या बाबाने दिलेल्या मंत्राचा जप करतात, माळा ओढतात, नामस्मरणाच्या वह्या भरतात आणि स्वतला धन्य समजतात.

तो बुवा म्हणजे साक्षात परमेश्वर आहे अशी त्याच्या भक्तांची नितांत श्रद्धा असते. त्या श्रद्धेच्या विरुद्ध जरा कुणी बोललं की, ही भक्त मंडळी चवताळून उठतात. अशा बाबांपासून आणि त्याहूनही त्यांच्या भक्तांपासून थोडाफार विचार करू शकणाऱया आपल्या सारख्यांनी दूर राहणं हेच शहाणपणाचं असतं. त्या वाटेला आपण जाऊच नये. मग तुम्ही विचाराल, सत्संगाचं काय? सत्संग हवाच ना? सत्संगाची म्हणजेच चांगल्या संगतीची प्राप्ती करून घेणं अत्यंत सोपं आहे. हिंदुस्थानात आणि विशेषत आपल्या महाराष्ट्रात अनेक संत झाले. त्या संतांनी निर्माण केलेल्या अक्षर वाङ्मयाचा ठेवा आपल्यापाशी आहे. माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ आहे, तुकोबांची ‘गाथा’ आहे, नाथांचं ‘भागवत’ आहे, नामदेवांचे ‘अभंग’ आहेत, समर्थ रामदास स्वामींचा  ‘दासबोध’ आहे. या पाच ग्रंथांपैकी कोणताही एक ग्रंथ निवडावा आणि वाचायला सुरुवात करावी. सुरुवातीला कदाचित कळायला थोडा वेळ लागेल, पण हळूहळू कळत गेलं की, आयुष्य उजळत जाईल. ज्ञानप्रद ग्रंथांच्या संगतीपेक्षा आणखी वेगळा सत्संग कोणता असू शकतो?

हा सत्संग करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च नाही. प्रवास करून कुठेही लांब जाण्याची गरज नाही. तासन्तास वेळ मोडून, रांगेत उभं राहून कुणाही महाराजाचं दर्शन घेण्याची गरज नाही. वेळेचं बंधन नाही, कोणताही जप करण्याची गरज नाही, गळ्यात लॉकेट घालायला नको की खिशाला बिल्ला लावायला नको. कोणत्याही बाह्य उपचारांच्या मदतीशिवाय हा सत्संग करता येतो.

म्हणूनच ग्रंथ हा सर्वोत्तम गुरू असं माझं मत आहे. वर उल्लेखिलेल्या ग्रंथाव्यतिरिक्त इतरही अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. अनेक थोरामोठ्यांची चरित्रं-आत्मचरित्रं आहेत. रामायण, महाभारतावर अनेक पुस्तकं-कादंबऱ्या उपलब्ध आहेत. स्वामी विवेकानंदांनी, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली अनेक पुस्तकं आहेत. आचार्य अत्र्यांचे लेख-अग्रलेख उपलब्ध आहेत. त्यातूनही बरंच काही शिकता येईल. ग्रंथाच्या व्यतिरिक्त जर कोणाला गुरू करायचा असेल तर तो गुरू आपला खराखुरा मितवा असावा. मितवा म्हणजे मित्र… तत्त्वज्ञ… आणि वाटाडय़ा… ज्याला इंग्रजीत फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड म्हणतात. हा मितवा संकटात मदतीचा हात देतो. अडचणीत साथ देतो. आपण चुकत असलो तर कडक शब्दांत हजेरी घेऊन चूक दाखवतो. योग्य काय आणि अयोग्य काय, याची जाणीव करून देतो आणि हिताचा मार्ग दाखवतो. चुकलो की, पाठीवर धपाटा घालतो तशीच पाठीवर कौतुकाची थापही देतो. केवळ बोचरी टीका करून चुका काढत नाही, तर त्या चुका कशा सुधाराव्यात याचं मार्गदर्शनही करतो. केवळ वाट दाखवत नाही, तर त्या वाटेने आपल्याला सोबतदेखील करतो. असा हा ‘मितवा’ आपल्या आजूबाजूलाच असतो, पण तो सापडायला मात्र फार मोठं नशीब लागतं. हा मितवा गुरू ज्याला लाभतो त्याचं आयुष्य धन्य होतं. ज्याच्या आयुष्यात अशी व्यक्ती येते, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस ही गुरुपौर्णिमाच असते.

मला अनेक जण विचारतात की, तुमचा मितवा कोण? यावर मी उत्तर देतो, माझा मितवा भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातून, त्याच्या जीवनपटातून आणि त्याने केलेल्या भगवद्गीता उपदेशातून मी बरंच काही शिकलोय आणि शिकतोय. या गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी तुम्हा सर्वांच्या आयुष्यात असा योग्य ‘मितवा’ येवो आणि तुमचंही आयुष्य उजळो!

[email protected]