विशेष – गुरुपौर्णिमा आणि मानसपूजा

<<< उदय पिंगळे

आज गुरुपौर्णिमा. आपल्या आयुष्यातील अज्ञान दूर करणारा गुरू ज्याचे संस्कार आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडतात. आपल्याला उन्नत व उत्क्रांत करणारा गुरूचा वरदहस्त कायम लाभावा. मानवाच्या श्रेष्ठत्वाच्या मुक्तीच्या शक्यतेला प्रकाशात आणणाऱ्या गुरूंचे स्मरण वंदनीय आहे.

आज आषाढ पौर्णिमा. त्यास गुरुपौर्णिमा असे म्हणतात. गुरू म्हणजे अज्ञान दूर करणारा. तो कोणीही असू शकतो. वैदिक हिंदू परंपरेत मुनिवर ‘व्यास’ यांचा जन्म या दिवशी झाला, त्यांनी ब्रह्मसूत्रे लिहिण्याचा प्रारंभ याच काळात केला असं मानण्यात येतं. व्यासांनी त्यांच्या काळात अस्तित्वात असलेली सर्व वैदिक स्तोत्रे एकत्र केली. त्यांची वैशिष्ट्ये आणि संस्कारामध्ये उपयोग होईल अशी चार भागांत विभागणी करून आपल्या पैला, वैशंपायन, जैमिनी आणि सुमंतू या चार मुख्य शिष्यांना पारंगत केले. वेदांचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थववेद असे भाग केले. या विभाजन आणि संपादन कार्यामुळे त्यांना ‘व्यास’ म्हणजेच विभाजन करणारा हा सन्मान मिळाला. त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो.

बौद्ध परंपरेनुसार भगवान बुद्धांनी आपला पहिला उपदेश ‘सारनाथ’ येथे या दिवशी दिला. जैन परंपरेनुसार भगवान महावीरांनी कैवल्य प्राप्त केल्यावर याच दिवशी गौतम स्वामींना आपला पहिला शिष्य बनवले. योगिक परंपरेत याच दिवशी ‘शिव’ हे पहिले गुरू बनले आणि त्यांनी सप्तर्षींना योग शिकवला. धार्मिक महत्त्वाबरोबर अभ्यासक आणि विद्वान यांच्यासाठी हा दिवस महत्त्वाचा असून या दिवशी ते त्यांच्या गुरूचे पूजन करतात.

गुरुपौर्णिमा ही मानवाच्या इतिहासातील सर्वोच्च क्षणांना अधोरेखित करते. आजवर मानव ज्यापासून अनभिज्ञ होता, त्या श्रेष्ठत्वाच्या मुक्तीच्या शक्यतेला प्रकाशात आणते. तुमचा जन्म कोणत्या वंशात झाला, तुमचा जन्मदाता कोण किंवा जन्मतःच अथवा त्यानंतर तुमच्यात कोणत्या कमतरता, दोष आहेत त्यांनी काहीच फरक पडत नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तुमची तयारी असेल तर तुम्ही अलौकिक झेप घेऊ शकता. मानवजातीच्या इतिहासात मानवाला हे प्रथम समजलं आणि त्यांनी घोषित केलं की, उक्रांत आणि उन्नत होणं शक्य आहे.

मानवी चैतन्य उन्नत होण्यासाठी सतत विकसित होणं मनुष्याला शक्य आहे. जे लोक ‘मी जसा आहे तसाच योग्य आहे’ यावर विश्वास ठेवतात, कारण त्यांना या शक्यता मान्य नाहीत. हजारो वर्षे मानवजातीसाठी नवनवीन शक्यता उपलब्ध करून देणारा दिवस म्हणून गुरुपौर्णिमा ओळखली जाते आणि साजरी केली जाते. जे योगविज्ञान मानवजातीला उपलब्ध झाले ते कोणत्याही धर्माच्या प्रारंभाआधीचे आहे. मानवी चेतना वाढवण्यासाठी आवश्यक शक्तिशाली साधने निर्माण करून मानवाने त्यांचा प्रसार केला. हे ज्ञान विशिष्ट विचारसरणीतून नव्हे, तर आंतरिक साक्षात्कारातून आले आहे.

गुरुपौर्णिमेचा संबंध मोक्ष आणि मुक्तीशी आहे. तुम्ही सर्व मर्यादा सोडून प्रगती करू शकता. त्यासाठी गुरू हा महत्त्वाचा दुवा आहे. म्हणूनच हजारो वर्षे आपल्या संस्कृतीत हा दिवस एक महत्त्वाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. या दिवशी शक्य असल्यास गुरूंचे आशीर्वाद घ्यावेत, पूजन करावे. हे शक्य नसल्यास स्मरण करावे आणि आपल्या गुरूंची मानसपूजा करावी. कोणत्याही पूजेपेक्षा मानसपूजा ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. लोक वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करू शकतात. मानसपूजा आपण नियमित करू शकतो आणि आपल्या गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आपण ज्यांना गुरू मानतो त्यांची घरात कोणत्याही प्रतीकात्मक रूपात एका विशिष्ट ठिकाणी स्थापना करा. स्थापना करताना मनोमन ते आपल्या घरात येत आहेत, आपल्या ऐपतीप्रमाणे आपण त्यांचे स्वागत करून त्यांचे पूजन करा.

रोज दोन मिनिटे का होईना, डोळे मिटून त्यांच्या पायावर मनोमन दोन फुले ठेवा, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांच्यापाशी आपल्या संकल्पना, अडचणी बोलून दाखवा. विश्वास ठेवा, ते आपल्याला काहीतरी मार्ग दाखवतील. कुठून तरी त्याचे उत्तर तुम्हाला नक्की मिळेल.

आपल्यात दोष असतील तर मनोमन ते सोडण्याचा संकल्प करा. आपल्याला आपल्या गुरूंसारखे व्हायचे आहे, असा संकल्प करा. हळूहळू दोष कमी होतील. सद्गुरूंची तुमचे अधिक चांगले व्हावे ही इच्छा असतेच.

सर्वांबद्दल प्रेमभावना बाळगा. आपल्यासोबत आपले गुरू आहेत, त्याऐवजी आपण गुरूंच्या घरी आहोत हा भाव मनात ठेवा. जमेल तसे त्यांचे चिंतन करा. वातावरण प्रसन्न ठेवा.

आपली दैनंदिन कामे आवडीने करीत रहा. कार्यबाहुल्याने कदाचित तुम्हाला दिवसभरात वेळ होणार नाही. अशा वेळी आपली मानसपूजा रात्री करावी. ती करताना डोक्यात अन्य विचार नसावेत. जसे की, हे काम बाकी आहे, इथे जायचे आहे. आपण मानसपूजा आपल्या मर्जीप्रमाणे करू शकतो, ती खालील पद्धतीने करता येईल…

आपल्या गुरूंना डोळ्यांसमोर आणा. त्यांना छानशा सोन्याच्या पाटावर बसवा. त्यांचे पाय ताम्हणात सोडून पायावर कोमट पाणी सोडा. मऊ वस्त्राने त्याचे पाय पुसून त्यांना चौरंगावर बसवा. त्यांना फुलं वाहा. रोज त्यांचे उपरणं वेगवेगळ्या रंगाचे आहे अशी कल्पना करा. धूप, अगरबत्ती लावा. त्यांच्या हाताला अत्तर लावा, त्यांच्या आवडीचे पदार्थ चांदीच्या ताटात ठेवून नैवेद्य दाखवा. रोज नवीन पदार्थ ठेवा. त्यांना पदार्थ भरवा, ते पदार्थ चांगला झाला आहे, असे म्हणत असल्याची कल्पना करा. जेवण झाल्यावर हात पुसायला रुमाल द्या, मुखवास द्या. नंतर त्यांच्याशी गप्पा मारा, अडचणी सांगा, त्यावर मार्ग कोणता ते विचारा, नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्या. त्यानंतर त्यांना जाऊ न देता आपल्या हृदयात बसवा. हे करत असताना कदाचित झोप लागण्याची शक्यता आहे. त्याचे वैषम्य न बाळगता रोज नित्यनेमाने निश्चित वेळी अथवा झोपण्यापूर्वी पूजा करा. श्रद्धा बाळगा. गुरूंमुळे आपल्या जीवनात कोणत्याही समस्या राहणार नाहीत. त्यांच्याकडून कोणत्याही अपेक्षा नसतील असा भाव ज्या क्षणी निर्माण होईल तेव्हा आपली साधना पूर्णत्वास येत आहे असे समजा.

[email protected]

(लेखक अर्थ अभ्यासक आहेत.)