परीक्षण – ललित गद्याचा लोभसवाणा प्रवास

<<< श्रीकांत आंब्रे

बहुतेक सर्व वाङ्मय प्रकारांतील पन्नासहून अधिक पुस्तकं नावावर असलेले ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक प्रा. विश्वास वसेकर यांचं ललित गद्यावरील ‘विश्वावसूची निरूपणे-नवे ललित गद्य’ हे अलीकडेच प्रकाशित झालेलं पुस्तक. त्यांना मनापासून भावलेल्या गेल्या पन्नास वर्षांतील अगदी निवडक ललित लेखांचं नैसर्गिक सौंदर्य उलगडून दाखवत त्यांच्या अंतरंगाचा घेतलेला हा लालित्यमय वेध आहे.

डॉ. शैला लोहिया यांच्या ‘जखमी झाडांच्या पाऊलखुणा’तून त्यांना विचारांचं एक सुंदर अस्तर अनुभवायला मिळतं, तर कविमनाच्या बा. भ. बोरकर यांच्या ‘शहाणिवेचे लघुनिबंध’मध्ये मिस्कील, रसिक, प्रसन्न वृत्तीच्या बोरकरांची जगण्यातला आनंद वाटण्याची वृत्ती ओसंडून वाहताना दिसते. प्रा. मिलिंद जोशी यांच्या समाज, साहित्य संस्कृती व महापुरुषांविषयी निगडित लेखनातून त्यांना चिंतन आणि संवेदनक्षमतेची प्रकर्षाने जाणीव होते, तर चराचरांतील प्राणिसृष्टी आणि वनश्रीसृष्टीला आपल्या जाणिवांचा विषय आणि निरीक्षणातून वैविध्यपूर्ण अनुभव घेत समृद्ध आणि संपन्न बनविणारे मारुती चितमपल्ली हे  एकमेवाद्वितीय उदाहरण असल्याचे ते ठासून सांगतात. ‘सोबत’कार ग. वा. बेहरे यांच्या तडफदार लेखनातील बेडरपणावर ते खूश होतात, तर ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांच्या ‘गुलमोहोर’ या पुस्तकातील देश, महाराष्ट्र आणि जग यांच्या प्रगतीच्या खुणा दर्शविणारी गडकरी यांची साधी, सरळ, प्रवाही लेखनशैली त्यांना प्रभावित करते. खुशवंतसिंग यांच्या खुल्लमखुल्ला शैलीतील ‘सेक्स, स्कॉच आणि स्कॉलरशिप’ या पुस्तकाचा अनिल किणीकर यांनी केलेला अप्रतिम मराठी अनुवाद मूळ भाषेइतकाच त्यांना अस्सल वाटतो. ‘प्रेमातून प्रेमाकडे’ या अरुणा ढेरे यांच्या पुस्तकात स्त्री-पुरुष नात्यातील शारीरिक आकर्षणापलीकडच्या मैत्रीचा त्यांनी घेतलेला वेध ही एक वेगळीच अनुभूती असल्याची साक्ष त्यांना पटते. वपुंच्या कथाविश्वाचा नेमका अर्थ सांगताना त्यांची कथा ‘आपली’ कशी होते याचं इंगित ते सांगतात. भारत सासणे, रवींद्र शोभणे, पुरुषोत्तम सेठ यांच्या ललित गद्याची ठळक वैशिष्ट्येही ते स्पष्ट करतात.

इब्ने इर्शा यांच्या ‘उर्दू की आखरी किताब’ या पुस्तकात फाळणीनंतरच्या पाकिस्तानातील पाठ्यपुस्तकांमधील हास्यास्पद धड्यांमधील अगाध ज्ञानाची इर्शा यांनी उडवलेली खिल्ली आणि त्यातील व्यंग त्यांना भावतं. प्रसिद्ध स्तंभलेखक द्वारकानाथ संझगिरी यांच्या ‘वल्ली आणि वल्ली’ या पुस्तकात भन्नाट जगावेगळ्या माणसांच्या जगावेगळ्या जगण्याची व्यक्तिचित्रं प्रा. वसेकरांना आकर्षित करतात. हेच वेगळेपण त्यांनी लेखनातून जोपासून आपल्या लेखन सामर्थ्याची खरी वाट चोखाळावी असा सल्लाही ते आत्मियतेने देतात. ‘मराठवाड्याचे ललित गद्य’ या लेखात लेखन हीच जीवननिष्ठा असलेले ज्येष्ठ पत्रकार अनंत भालेराव हेच मराठवाड्यातील सर्वश्रेष्ठ ललित गद्यकार असं ठाम प्रतिपादन करत मराठवाड्यातील ललित गद्य लेखकांची मांदियाळी ते त्यांच्या वैशिष्ट्यांसह सादर करतात. ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांच्या स्तंभलेखनातून त्यांना एकाच वेळी श्रेष्ठ दर्जाच्या वैचारिकतेचा आणि कोमल संवेदनांचा प्रत्यय येतो. निसर्गप्रेमी बाबा भांड यांची ‘आनंदघन’ ही कादंबरी त्यांच्या निसर्गसृष्टीवरील प्रेमाची साक्ष देते, तर ‘टिकली तर टिकली’ यासारख्या श्रद्धा बेलसरे यांच्या ललित गद्यातून माणूस समजावून घेणाऱ्या स्वभावाचं लोभसवाणं दर्शन त्यांना घडतं. रवींद्र तांबोळी यांच्या ‘फुकटचे सल्ले’मधून सर्व क्षेत्रांतील व्यंगांचं उपहासात्मक दर्शन घडतं आणि पुलंच्या शैलीशी साम्य असणारा लेखक म्हणून तांबोळींच्या लेखाचं ते कौतुक करतात. श्रीपाद बह्मे यांच्या ‘कॉफी शॉप’मध्येही त्यांना प्रसन्न विनोदाची पखरण जाणवते, तर ‘प्रतिभावंतांचा गाव’ या सुनीता राजे यांनी संपादित केलेल्या ग्रंथातून ज्येष्ठ साहित्यिकांच्या आपल्या गावाविषयीच्या भावना बोलक्या होताना दिसतात. प्रा. विश्वास वसेकर यांच्या या पुस्तकातून मराठवाडय़ातील दुर्लक्षित राहिलेल्या अनेक लेखकांच्या गुणांची ओळख पटते. मात्र आजच्या काही नवोदित लेखकांच्या ललित गद्यात जाणवणारी कृत्रिम भावनांची असोशी, शब्दबंबाळ अलंकारांचं लेपन आणि जाणीवपूर्वक लेख सजवून मांडण्यातून आलेलं बेगडीपण चव्हाटय़ावर आणून या वृत्तीला ते फटकारतात. ल. म. कडू यांचं वेधक मुखपृष्ठ आणि ललित गद्याचा हा प्रवास मनभावन असाच आहे.

विश्वावसूची निरूपणेनवे ललित गद्य

लेखक ः प्रा. विश्वास वसेकर

प्रकाशक ः सायन पब्लिकेशन्स, पुणे

पृष्ठे ः 164 n मूल्य ः रुपये 210/-