सिनेविश्व – कापायचाच होता तर रिलीजपूर्वीच…

<<< दिलीप ठाकूर

सिनेमांच्या जगात अनेक छोट्या छोट्या गोष्टींचे वाटेल तसे अर्थ-अनर्थ काढता येऊ शकतात. पण हे तुमच्या पाहण्या न पाहण्यावर आहे. असाच एक फंडा म्हणजे चित्रपट प्रदर्शित होऊन पहिले तीन दिवस होत नाही तोच त्यातील नाही दृश्ये किंवा गाणे कापायचे. ‘हिन्दुस्तानी 2’ पडद्यावर आला, पण रसिकांनी पाठ फिरवल्यावर कमल हसनने तेच केले आणि मधला काही भाग मिळून चक्क वीस मिनिटांचा भाग कापला. पण एकदा का पिक्चरचा रिपोर्ट पब्लिकमध्ये पसरला नि रुजला की ते त्यात बदल करत नाहीत. त्यापेक्षा चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर त्याच्या ट्रायल करत त्याची लांबी-रुंदी व्यवस्थित आहे का जाणून का घेत नाहीत? याचे कारण, आपला जास्त लांबीचा चित्रपट रसिकांना आवडलाच तर तो कापायचा कशाला? ‘अ‍ॅनिमल’चे तेच तर झाले…

हे असे चित्रपट प्रदर्शित होताच काही भाग कापणे नवीन नाही. ते अनेक वर्षे चालले आहे. कधी त्याची बातमी झाली, कधी चर्चा रंगली. असे तीन भारी चित्रपट सांगतो. राज कपूर निर्मित, दिग्दर्शित, संकलित आणि अभिनित ‘संगम’ (18 जून 1964) व ‘मेरा नाम जोकर’ (रिलीज 18 डिसेंबर 1970) आणि सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन’ (रिलीज 5 ऑगस्ट 1994) हे चित्रपट. ‘संगम’ दोन मध्यंतरचा चित्रपट म्हणूनच रसिकांनी एन्जॉय केला. हा चोवीस रिळांचा चित्रपट. म्हणजे 238 मिनिटे. दोन मध्यंतर होते. ‘मेरा नाम जोकर’ची लांबी खूप मोठी आणि त्यामुळे पुन्हा दोन मध्यंतरांचा चित्रपट. सुरुवातीस चित्रपटाची लांबी 4 तास आणि 43 मिनिटे (दोन मध्यंतरे) अशी होती. फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच तो ‘पडला पडला’ अशी जोरदार आवई उठली आणि त्याची लांबी कमी करून ती 178 मिनिटे (एक मध्यंतर) अशी करण्यात आली. ती जर अगोदरच केली असती तर? पण हे राज कपूरला कसे कोण सांगणार?

‘हम आपके…’ या सिनेमालाही दोन मध्यंतर. ही लांबी जरा जास्त आहे हे लक्षात आल्यावर नंतर तो 3 तास 26 मिनिटांचा करण्यात आला. कारण, व्हिडीओ कॅसेटमध्ये सामावू शकत नाही अशीही एक चर्चा. ‘संगम’ काही वर्षांनी सेकंड रनला एका मध्यंतरचा करण्यात आला. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ (2001)च्या कापाकापीची तऱ्हाच वेगळी. ग्रामीण भागातील चित्रपटगृहात दिवसा चार खेळ पध्दतीने चित्रपट प्रदर्शित होतो. पण ‘लगान’च्या लांबीने दिवसा तीनच खेळ होत होते आणि रात्री बारानंतर रिक्षा मिळणे अडचणीचे ठरे. यावर उपाय म्हणून तिकडच्या चित्रपटगृह चालकांनी आपल्या अधिकारात ‘पडद्यावरचा क्रिकेट सामना’ थोडा कमी केला आणि चार खेळांचा हिशोब चोख ठेवला. चित्रपट कापायला दिग्दर्शक अथवा संकलकच हवा असे नव्हे, कुठे कुठे थिएटरवाल्यांच्याही हातात ते असते.