लेन्सआय – सनस्टोरी

<<< दुर्गेश आखाडे

एखाद्या व्यावसायिक फोटोग्राफरलाही तोंडात बोटं घालायला लावेल असे फोटो केवळ मोबाइलच्या माध्यमातून काढणारा आदित्य भट. त्याच्या सनस्टोरींना सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्याच्या या बोलक्या सनस्टोरीज.

घरामध्ये साधा मोबाइल असताना आदित्यला स्मार्टफोनचं प्रचंड आकर्षण होतं. पण स्मार्टफोन वापरायला कधी मिळू शकेल का? याची त्याला खात्री नव्हती. कोरोनाच्या काळात लॉक डाऊन झाल्याने आदित्यचे कॉलेजही बंद झाले. काही दिवसांनंतर ऑनलाईन वर्ग सुरू झाल्यानंतर स्मार्टफोनची गरज भासली. स्मार्टफोन घेतल्यानंतर आदित्यला वेड लावले ते
कॅमेऱयाने. लॉकडाऊन असल्यामुळे दिवसभरात पुष्कळ वेळ आदित्यकडे होता. या काळात त्याने मोबाइलवरून फोटो काढायला सुरुवात केली. आदित्य भट पावससारख्या परिसरात राहात असल्यामुळे आजूबाजूला जंगलमय परिसर होता. निसर्गातील विविधता आदित्यने कॅमेऱ्यात टिपायला सुरुवात केली. हळूहळू कॅमेऱ्याच्या सेटिंगचा शोध घेऊन त्याने सूर्याचे फोटो काढायला सुरुवात केली. एखाद्या व्यावसायिक फोटोग्राफरलाही तोंडात बोटं घालायला लावेल असे फोटो केवळ मोबाइलच्या माध्यमातून आदित्य भट काढू लागला. त्याच्या या सनस्टोरींना सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

आदित्य भटने सुरुवातीला पानाफुलांचे फोटो काढायला सुरुवात केली. त्यानंतर तो वन्य जीवांचे, कीटकांचे फोटो काढू लागला. कीटकांचे फोटो काढताना त्याने लेन्सचा वापर करायला सुरुवात केली. मोबाइलच्या माध्यमातून त्याने मायक्रो फोटोग्राफी करायला सुरुवात केली. त्यामध्ये हॅलो करणारी भिंगरी, माशी उचललेली मुंगी, पाणी पिताना मुंगी… अशी काही सूक्ष्म छायाचित्रे त्याने काढली. मायक्रो फोटोग्राफीच्या माध्यमातून त्याने काही कीटकांचे, पक्ष्यांचे, सापांचेही फोटो काढले आहेत. फोटोग्राफीमध्ये प्रचंड आवड असतानाही त्याने कधी कॅमेरा हातात घेतला नाही. त्याने आतापर्यंत सर्व फोटो मोबाइलवर काढले आहेत. त्याच्याकडे जवळजवळ एक हजाराहून अधिक मायक्रो फोटोग्राफीचा संग्रह तयार झाला आहे.

जवळच असलेल्या गावखडी समुद्रकिनाऱ्यावर जाऊन आदित्य सूर्यास्ताचे फोटो काढत असे. फोटो झूम करून पाठीपुढे करून काहीतरी वेगळे करता येते का, ते पाहू लागला. हातात घेतलेला सूर्य असे काही नेहमीप्रमाणे फोटो त्याने काढले. त्याच्यातूनच त्याला सनस्टोरीची कल्पना सुचली. मोबाइलच्या सेटिंगमध्ये त्याने सूर्याचा फोटो काढताना एका बाजूला शॅडो तयार होत असते त्याचा शोध घेतला आणि मग त्याच्या सनस्टोरीला सुरुवात झाली. आयत्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर जाऊन सनस्टोरी करणे शक्य नव्हते. त्याकरिता तो सनस्टोरीचा अभ्यास करू लागला. सनस्टोरीसाठी विषय शोधू लागला. एखादी कथा कॅमेऱ्यातून कशी मांडता येईल? याचा तो विचार करू लागला. सनस्टोरी करण्यापूर्वी काही तालमीही तो करू लागला. गावातीलच आजूबाजूच्या दोन-तीन मित्रांना घेऊन तो सनस्टोरीची क्रिप्ट बनवू लागला. मित्रांना वेगवेगळ्या अ‍ॅक्शनचा सराव देऊन तो त्यांची तालीम घेऊ लागला. त्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर जाऊनही एक दिवस प्रत्यक्ष रंगीत तालीम करून मग दुसऱ्या दिवशी सूर्यास्ताच्या प्रमाणे तो फोटोग्राफी करू लागला. सूर्य जसजसा मावळत जातो तसतशा उलट पध्दतीने तो क्रिप्ट तयार करून तो फोटोग्राफी करू लागला. कध्सनस्टोरीमध्ये टायमिंगला खूप महत्त्व आहे. टायमिंग चुकले की पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच वेळी समुद्रकिनारी येऊन ते टायमिंग साधावे लागत होते. सनस्टोरी करताना प्रचंड चिकाटी आणि एकाग्रता आवश्यक असते. ती आदित्यकडे होती. सुरुवातीला त्याने सौरकंदिल, युध्दाचा प्रसंग सनस्टोरीच्या माध्यमातून साकारले. सूर्य अंगावर फेकून देतोय असा तो प्रसंग होता. वजनकाट्यावर सूर्याची विक्री हा गमतीदार प्रसंग त्याने उत्तमरीत्या साकारला आहे, सायकलवरून सूर्य घेऊन जातानाची एक अप्रतिम सनस्टोरी आपल्याला पाहायला मिळते. डबीत भरलेला सूर्य हा अतिशय कौशल्यपध्दतीने त्याने मांडलाय, चेंडूच्या ऐवजी सूर्याबरोबर क्रिकेट खेळताना, धनुष्यबाण, गोळाफेक, बैलगाडीतून सूर्य नेताना, घमेल्यात भरून सूर्य नेतानाची सनस्टोरी त्याने मोठय़ा कौशल्याने साकारली आहे. या सनस्टोरींना सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आदित्यचे फोटो आणि त्यावरील लेख रशिया, पोलंड, स्पेन, थायलंड, इराण, ब्राझील, पोर्तुगाल, हंगेरी, जपान, कोरिया, चीन, इटली, अमेरिका, इंडोनेशिया, फ्रान्स यासारख्या देशांतील सोशल मीडियावर प्रसिध्द झाले आहेत. आदित्यने मोबाइल फोटोग्राफीमध्ये एक विक्रमही केला आहे. वर्ल्ड वाइल्ड बुक्स रेकॉर्डमध्ये एका मिनिटात 163 फोटो मोबाइलवर काढण्याचा विक्रम त्याने केला आहे.

[email protected]