
राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र योजना प्रत्यक्षात राबवण्याआधीच जागोजागी उडालेल्या गोंधळाचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात योजनेशी संबंधित महिला मेळाव्याच्या आढावा बैठकीत ‘तू तू, मै मै’चे नाट्य रंगले. जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड व बँकेच्या पारनेर शाखेतील तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. या बैठकीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
प्रशांत गायकवाड हे वारंवार अपमानास्पद वागणूक देत असल्याने प्रभाकर लाळगे यांचा संयम सुटला आणि त्यांनी भर बैठकीतच राजीनामा देण्याचा इशारा दिला. तुमच्या जाचाला कंटाळून मी राजीनामा देतो, असे बोलून दाखवत लाळगे यांनी संताप व्यक्त केला.
येत्या सोमवारी पारनेरमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्या मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी आज अजित पवार गटाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.
बैठकीदरम्यान प्रभाकर लाळगे यांना प्रशांत गायकवाड यांनी सर्वांदेखत अपमानास्पद वागणूक दिली. यापूर्वीही अशाप्रकारे घटना घडल्या होत्या. त्यामुळे लाळगे यांचा संयम सुटला आणि तुमच्या जाचाला कंटाळून मी राजीनामा देऊन घरी निघून जातो, असे गायकवाड यांना सुनावत लाळगे बैठकीत निघून गेले. लाळगे संतापल्यानंतर गायकवाड यांनी त्यांच्यापुढे हात जोडले. मात्र लाळगे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या घटनेच्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रशांत गायकवाड अजित पवार यांच्यासोबत गेले. मात्र जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्यानंतर त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांबाबत अजित पवार यांच्याकडे खोट्या तक्रारी करून बेबनाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही चलाखी उघडी पडल्यानंतर त्यांचे जिल्हाध्यक्षपद औटघटकेचे ठरले. त्यांची जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी करून त्यांच्या जागेवर श्रीगोंद्याच्या बाळासाहेब नहाटा यांची नियुक्ती करण्यात आली होती.