
माझा शंभरावा वाढदिवस हे निमित्त असून या निमित्ताने चित्रकार एकत्र यावे आणि चित्रकलेचे माध्यम अधिक स्थिरावे हा मुख्य उद्देश आहे, कारण आजही नृत्य, साहित्य आदी कलांच्या तुलनेत चित्रकला आणि त्यातही व्यंगचित्रकला समाजात रुजलेली नाही. चित्रकला किंवा व्यंगचित्रकलेत आपणच आपल्याला विसरून टाकण्याची शक्ती आहे. एकप्रकारे चित्रकला किंवा व्यंगचित्रकलेत आपण तादात्म्य पावतो, अशी भावना व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी नुकतेच 100 व्या वर्षांत पदार्पण केले त्यानिमित्त वसुंधरा क्लब आणि कार्टूनिस्ट्स कम्बाईन यांच्या संयुक्त विद्यमाने कोहिनूर प्रस्तुत ‘शि. द. 100’ हा भव्य चार दिवसांचा महोत्सव बालगंधर्व रंगमंदिरात सुरू असून महोत्सवाच्या आज दुसऱया दिवशीच्या पहिल्या सत्रात बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्या हस्ते फडणीस आणि महाराष्ट्रतील कलाकारांच्या चित्रांचा समावेश असलेल्या हसरी गॅलरीचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. हा महोत्सव 1ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
यावेळी व्यासपीठावर कृष्णकुमार गोयल, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, मसाप कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, मकरंद केळकर, महोत्सव संयोजक वसुंधरा क्लबचे वीरेंद्र चित्राव, कार्टूनिस्ट्स कम्बाईनचे चारुहास पंडित आणि नचिकेत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
फडणीस म्हणाले, सर्व साधारणपणे सृजनाच्या क्षेत्रात असणाऱया कलाकारांना नेहमी विचारले जाते की, तुम्हांला सुचले कसे? या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नसून त्यासाठी कलाकाराला कल्पनेचा पाठलागच करावा लागतो. आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विविध तंत्रज्ञान येत आहे. त्या तंत्रज्ञानामुळे घाबरून न जाता आपण कलाकारांनी त्या तंत्रज्ञानाचे स्वागतच केले पाहिजे. त्याचा उपयोगही केला पाहिजे.
मिलिंद जोशी म्हणाले, सर्वसामान्यांचे रोजच्या जगण्यातले विषय घेऊन फडणीस यांनी जगण्यातले व्यंग मांडले. फडणीस यांनी मराठी माणसाच्या जाणिवा आणि संवेदनशिलता जागृत केली. फडणीस यांना केवळ व्यंगचित्रकार संबोधणे त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल. ते लढवय्ये व्यंगचित्रकार होते .
सुधीर गाडगीळ म्हणाले, मी पत्रकार आणि मुलाखतकार या नात्याने बोलण्याच्या आणि बोलते करण्याच्या क्षेत्रात आहे. आणि फडणीस यांच्या रेषाच इतक्या बोलक्या आहेत की, त्यापुढे आम्हीदेखील बोलत नाही.