विद्यापीठांनी यूजी, पीजी अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घ्यावी; यूजीसीचे कुलगुरूंना निर्देश

यूजी आणि पीजी अभ्यासक्रमांच्या रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांना परवानगी दिली आहे. देशभरातील विद्यापीठांमधील विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीयूईटी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतील पात्रता गुणांच्या आधारे प्रवेशाच्या तीन नियमित फेऱया पार पडूनही विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. विद्यापीठातील एकही जागा रिक्त राहू नये यासाठी यूजीसीने विद्यापीठांना प्रवेशपरीक्षा घेऊन 100 टक्के जागा भरण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यूजीसीचे अध्यक्ष प्रा.जगदेश कुमार यांनी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांची प्रत्येक जागा मौल्यवान असून रिक्त जागा भरण्यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यूजी आणि पीजी अभ्यासक्रमांच्या जागा भरण्यासाठी केंद्रीय विद्यापीठांमध्ये सीयूईटी प्रवेश परीक्षेतील पात्रता गुणांच्या आधारे प्रवेशाच्या तीन नियमित फेऱया घेण्यात आल्या होत्या. या फेऱयांनंतरही काही विद्यापीठांतील जागा रिक्त राहिल्या आहेत. या जागा भरण्यासाठी यूजीसीने आता विषयांचे निकष शिथील करण्याच्या सूचनाही विद्यापीठांना दिल्या आहेत. तसेच जागा भरण्यासाठी विद्यापीठांनी आपापल्या स्तरावर प्रवेश परीक्षा आयोजित करण्यासही यूजीसीने म्हटले आहे.

यूजी प्रवेशासाठी 13.48 लाख नोंदणी

गेल्या आठवड्यात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) सीयूईटी यूजी परीक्षेचा निकाल जाहीर केला. ही परीक्षा 15 ते 24 मे दरम्यान विविध परीक्षा पेंद्रांवर घेण्यात आली. एनटीएने शेअर केलेल्या डेटानुसार, पदवीपूर्व प्रवेशासाठी 13.48 लाख तर पदव्युत्तर प्रवेश परीक्षेसाठी 2,62,725 नोंदणी झाली.