विक्रम पावसकरला भडकाऊ भाषण चांगलेच भोवणार

mumbai-highcourt

भाजप नेते विक्रम पावसकर यांना भडकाऊ भाषण चांगलेच अंगलट येणार आहे. या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी राज्य शासनाकडून चार आठवड्यात मंजुरी घ्या, असे आदेश उच्च न्यायालयाने सांगली पोलिसांना गुरुवारी दिले.

न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी सांगली येथे दोन गुन्हे दाखल आहेत. या गुह्यांचे आरोपपत्रही तयार आहे. समाजात तेढ निर्माण केल्याच्या गुह्याचे आरोपपत्र दाखल करताना राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. तसा प्रस्ताव सांगली पोलिसांनी राज्य शासनाकडे पाठवला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर आरोपपत्र दाखल केले जाईल, असे मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी खंडपीठाला सांगितले. चार आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण करा, असे आदेश न्यायालयाने दिले.

साताऱयाच्या गुह्यात पुरावा नाही

सातारा येथे जातीय दंगल उसळली होती. मशिदीवर हल्ला झाला होता. यात एकाचा मृत्यू झाला होता. यामध्येही पावसकर यांचा सहभाग आहे, असा आरोप याचिकाकर्ते शाकीर तांबोळी यांनी केला आहे. मात्र तपासात पावसकर यांच्याविरोधात कोणतेच पुरावे सापडले नाहीत. सातारा पोलीस याचा लवकरच अहवाल सादर करणार आहेत, असे मुख्य सरकारी वकील वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. ही सर्व माहिती शपथपत्रावर सादर करण्याचे आदेश खंडपीठाने सातारा पोलिसांना दिले.