Delhi Shelter Home News : दिल्लीच्या निवासी शाळेत 13 मुलांचा गुढ मृत्यू, गेल्या आठ महिन्यांत 27 मुलांचा मृत्यू

दिल्लीच्या एका सरकारी निवासी शाळेत 13 मुलांचा गुढ मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत या निवासी शाळेत 27 मुलांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीत सरकारकडून आशा किरण नावाने दिव्यांग मुलांसाठी निवासी शाळा चालवली जाते. गेल्या 20 दिवसांत इथे 13 मुलांचा मृत्यू झाला आहे. या मुलांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळालेले नाही. धक्कादायक म्हणजे हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. या मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदनानंतरच कळेल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी सत्यशोधन समिती स्थापन केली आहे आणि निवासी शाळेत चौकशीसाठी पाठवली आहे. रेखा शर्मा म्हणाल्या की गेली अनेक वर्ष आशा किरण ही निवासी शाळा दिल्ली सरकारकडून चालवली जाते. पण आता या शाळेकडून कुठलीही आशा उरलेली नाही. लोकांना त्रास होतोय आणि त्यांचे जीव जाताहेत पण दिल्ली सरकार काहीच करत नाही असा आरोप शर्मा यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी दखल घेऊन सत्य शोधण्यासाठी मी माझी टीम पाठवली आहे असेही शर्मा म्हणाल्या.

पण जानेवरीपर्यंत या निवासी शाळेत 14 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा आपने केला आहे. अतिशी मार्लेना यांनी प्रशासनाला पत्र लिहून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढच्या 48 तासांत यावर अहवाल सादर करण्यासही सांगितले आहेत. मार्लेना यांनी लिहिलेल्या पत्रात जानेवरीत 14 मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

दुसरीकडे भाजपने यावरून आपवर टीका केली आहे. या निवासी शाळेत मुलांना स्वच्छ पाणी दिलं जात नाही, आजारी पडल्यास त्यांच्यावर उपचार केले जात नाही असा आरोप भाजप नेत्या रेखा गुप्ता यांनी केला आहे. याप्रकरणी संपूर्ण चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.