
‘महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी सरकार आणि गुजरातला महाराष्ट्र विकण्याचा उद्योग ज्यांनी सुरू केला आहे त्याच्यापासून महाराष्ट्र वाचवणं हे माझं, उद्धव ठाकरेंचं, शरद पवारांचं एकच उद्देश आहे’, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. TV9 मराठी च्या गणरायाच्या आरती वेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली.
‘आमच्या आमदारातून जो कोणी निवडला जाईल त्याला मुख्यमंत्री करणार. त्यामुळेच मोठा भाऊ आणि लहान भाऊ ही परंपरा आम्ही महाराष्ट्रात मोडीत काढतो, आम्ही सगळे समान आहोत’, असं त्यांनी अधोरेखित केलं.
जागा वाटपाच्या संदर्भात उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, ‘दोन दिवसांनी आम्ही त्यासाठी एकत्र बसणार आहोत. त्यामध्ये आमचा विचार असा आहे की ज्या मतदार संघात ज्या पक्षाची शक्ती असेल त्या जागा संबंधित पक्षाने घ्याव्यात जेणे करून महाविकास आघाडीचा स्ट्राइक रेट जास्त राहील आणि आमची तसेच आमच्या सोबत असलेल्या सर्व पक्षांना संधी मिळेल. त्या दृष्टीकोनातून मेरिटच्या आधारावर हे निर्णय घेतले जातील. असा प्रयत्न करणार आहोत’.
मुख्यमंत्र्यांना शरद पवारांच्या मार्गदर्शनाची गरज पडत असेल!
शरद पवार हे राज्यातले वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मार्गदर्शनाची गरज पडत असेल, असं पटोले म्हणाले.
राहुल गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मिंधे गटाच्या संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील पटोले यांनी यावेळी केली.